जीवाचं पाखरू होतं, पण ती गुलिगत…; सूरज चव्हाणची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’

Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan Lovestory : 'बिग बॉस मराठी' च्या पाचव्या सिझनचा विजेता सूरज चव्हाण... सूरज चव्हाणची सोशल मीडियावर क्रेझ आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. एका मुलाखतीत सूरजने त्याची लव्हस्टोरी सांगितली. त्याचीही चर्चा होतेय. वाचा सविस्तर...

जीवाचं पाखरू होतं, पण ती गुलिगत...; सूरज चव्हाणची प्यारवाली लव्हस्टोरी
सूरज चव्हाण
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 21, 2024 | 11:31 AM

सूरज चव्हाण… प्रसिद्ध रील स्टार… सोशल मीडियावर सूरज चव्हाणची चर्चा होत असते. त्याची स्टाईल अन् त्याचे डायलॉग व्हायरल होत असतात. सूरजच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घ्यायलाही लोकांना आवडतं. ‘गुलिगत धोका’ म्हणणाऱ्या सूरज चव्हाणला एका मुलीने ‘गुलिगत धोका’ दिलाय. सूरजने नुकतंच एका मुलाखतीत त्याच्या प्रेमाची गोष्ट सांगितली आहे. त्याच्या आयुष्यातील खास मुलीबद्दल सूरज बोलता झाला आहे.

जीवाचं पाखरू अन् गुलिगत धोका

आतापर्यंत किती मुलींनी तुला धोका दिलाय? असा प्रश्न सूरजला विचारण्यात आला. तेव्हा सूरज म्हणाला की एकाच मुलाने मला धोका दिला आहे. एकच होतं माझ्या जीवाचं पाखरू…. पण ते गुलिगत धोका देऊन उडून गेलं, असं सूरजने सांगितलं. लहानपणापासूनच मला क्रिकेटची आवड आहे. मी सारखं क्रिकेट खेळायचो. बॅटिंग बॉलिंग मी करायचो. जसं वारं असेल तसं बॉलिंग करायचो, असं सूरजने सांगितलं.

सूरजने त्याच्या प्रवासाविषयीही मत मांडलं. बिग बॉसच्या घरात मला माझं गाव कायम आठवत होतं. पण एकच ठरवलं होतं की ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी जिंकायची. गणपती बाप्पाकडं तेवढंच मागितलं. बाप्पांनी लगेच ते माझं मागणं पूर्ण केलं. गणपती बाप्पा आले तेव्हा मी म्हटलं की मला कॅप्टन बनवा, तर बाप्पांनी लगेच पुढच्याच आठवड्यात मला कॅप्टन केलं. मी म्हटलं मला ट्रॉफी हवी आहे. बाप्पाने ती मला दिली, असं सूरज चव्हाण म्हणाला.

माझे वडील कॅन्सरने गेले. वडील गेल्यानंतर माझी आई खूप खचली. तिला काहीच कळत नव्हतं. तिला वेड लागलं. ती रस्त्यावर जाऊन थांबायची. मग लोक जेव्हा मला सांगायचे तेव्हा मी तिला गाडीवर घरी घेऊन यायचो. पण वडिलांच्या चिंतेने ती गेली. वडील पण माझ्यावर खूप प्रेम करायचे. मी शाळेत जायचो. तर मला शाळेतलं काही जमायचं नाही. मग वडील म्हणायचे राहू दे नाही जमलं तरी चालतंय, असं सूरजने या मुलाखतीत सांगितलं.