Sahkutumb Sahaparivar: ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील मोरे कुटुंब घेणार जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन

खरंतर गेल्या काही दिवसांपासून मोरे कुटुंब बऱ्याच अडचणींचा सामना करत आहे. नेहमी गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या कुटुंबाला जणू कुणाची दृष्ट लागली आणि आपापसातले गैरसमज वाढत गेले.

Sahkutumb Sahaparivar: सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील मोरे कुटुंब घेणार जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन
12 जूनच्या महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांसाठी खंडेरायाच्या महादर्शनाचा सोहळा
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Jun 10, 2022 | 9:17 AM

जेजुरीचा खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष करत आणि भंडारा उधळत हजारो भाविक खंडोबाच्या दर्शनसाठी येतात. स्टार प्रवाह वाहिनीवरील सहकुटुंब सहपरिवार (Sahkutumb Sahaparivar) मालिकेतील संपूर्ण मोरे कुटुंब जेजुरीच्या (Jejuri) खंडेरायाच्या दर्शनाला जाणार आहेत. खरंतर गेल्या काही दिवसांपासून मोरे कुटुंब बऱ्याच अडचणींचा सामना करत आहे. नेहमी गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या कुटुंबाला जणू कुणाची दृष्ट लागली आणि आपापसातले गैरसमज वाढत गेले. कुटुंबावर ओढावलेलं हे अरिष्ट दूर व्हावं यासाठीच सर्वांनी मिळून जेजुरीला जायचं ठरवलं आहे. येत्या 12 जूनच्या महाएपिसोडमध्ये (Mahaepisode) सहकुटुंब सहपरिवारच्या कलाकारांसोबत प्रेक्षकांना खंडेरायाचा महादर्शन सोहळा अनुभवता येईल.

यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष करत संपूर्ण कुटुंबाने पारंपरिक पद्धतीने सर्व विधी पूर्ण करत खंडेरायाला साकडं घातलं आहे. गडाच्या पायऱ्या चढण्याचा विधीही या कुटुंबाने पूर्ण केला आहे. पश्याने अंजीला तर वैभवने अवनीला उचलून गडाच्या पायऱ्या चढल्या आहेत. हा सीन पूर्ण करताना सर्वांचीच तारेवरची कसरत झाली. मात्र जिद्दीने संपूर्ण टीमने हा सीन पूर्ण केला.

पहा व्हिडीओ-

सहकुटुंब सहपरिवार मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. याच प्रेमाचा साक्षात्कार जेजुरीच्या विशेष भागाच्या शूटिंगच्या निमित्ताने संपूर्ण टीमने घेतला. कुटुंब असावं तर मोरे कुटुंबासारखं, या मालिकेने आम्हाला सहकुटुंब सहपरिवाराचं महत्त्व पटवलं, जावा नाही तर मैत्रीणी म्हणून कसं रहावं हे सरु, अवनी आणि अंजीमुळे कळलं या आणि अश्या अनेक प्रतिक्रिया प्रेक्षकांनी मालिकेच्या संपूर्ण टीमला दिल्या. सहकुटुंब सहपरिवारचा हा जेजुरी विशेष भाग रविवारी दुपारी 2 आणि सायंकाळी 7 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.