थलपती विजय यांचं करिअर ज्यांनी घडवलं, त्यांचं अपघाती निधन; अखेरचा निरोप देताना ढसाढसा रडला अभिनेता
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते आर. बी. चौधरी यांचं रस्ते अपघातात निधन झालं. अभिनेता थलपती विजय त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचला होता. यावेळी आर. बी. चौधरी यांच्या मुलाला मिठी मारून त्यांनी सांत्वन केलं.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आर. बी. चौधरी यांचं 5 मे रोजी दुपारी एका भीषण अपघातात निधन झालं. तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये जवळपास शंभरहून अधिक चित्रपटांची निर्मिती करणारे आर. बी. चौधरी यांनी या अपघातानंतर उपचारादरम्यान आपले प्राण गमावले. उदयपूरमध्ये त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला होता. आर. बी. चौधरी यांचं पार्थिव बुधवारी चेन्नईमध्ये आणण्यात आलं. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी कलाविश्वातील अनेक मंडळी उपस्थित होती. यात टीव्हीकेचे प्रमुख आणि अभिनेता थलपती विजय यांचाही समावेश होता. विजय यांचं करिअर घडविण्यात आर. बी. चौधरी यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे त्यांच्या निधनाने विजय यांनाही मोठा धक्का बसला आहे.
थलपती विजय यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये ते आर. बी. चौधरी यांचं अंत्यदर्शन घेताना, त्यांच्या पार्थिवावर हात जोडताना दिसत आहेत. एका व्हिडीओमध्ये ते आर. बी. चौधरी यांचा मुलगा जिवा याला मिठी मारून त्याचं सांत्वन करताना दिसत आहेत. वडिलांच्या निधनानंतर जिवा पूर्णपणे खचला आहे. तो ढसाढसा रडताना विजय यांनी त्याला मिठी मारली आणि धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी विजयसुद्धा भावूक झाले होते. त्यांच्याही डोळ्यात अश्रू तरळत होते.
Stay strong brother @JiivaOfficial 🙏🏻@TVKVijayHQ pic.twitter.com/FxRWjgR2b5
— TVK Vijay Nation (@TVKVijayNation) May 6, 2026
1990 च्या दरम्यान विजय यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत होते. तेव्हा 1996 मध्ये आर. बी. चौधरी यांनी निर्मित केलेल्या चित्रपटामुळे त्यांना प्रचंड यश मिळालं होतं. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचं दिग्दर्शन विक्रमन यांनी केलं होतं. विजयच्या करिअरमधील हा सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट ठरला होता. हा चित्रपट तमिळनाडूमध्ये 270 दिवसांपर्यंत थिएटरमध्ये चालला होता. इतकंच नाही तर त्याचे विविध भाषांमध्ये रिमेकसुद्धा झाले. आर. बी. चौधरी हे ‘सुपरगुड फिल्म्स’चे संस्थापक होते. तमिळ सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांचं करिअर त्यांनी घडवलं होतं.
त्यांच्या अंत्यदर्शनाला विजय यांच्यासह चियान विक्रम, सूर्या, ममूट्टी हे सेलिब्रिटीसुद्धा उपस्थित होते. रजनीकांत, चिरंजीवी यांसारख्या दिग्गजांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘माझे प्रिय मित्र, सुपर गुड फिल्म्सचे आर. बी. चौधरी हे एक उत्कृष्ट निर्माते होते. एक अद्भुत माणूस. त्यांनी असंख्य तरुण दिग्दर्शकांना संधी दिली. त्यांच्या अकाली निधनाच्या बातमीने मला मोठा धक्का बसला आहे. मी खूप दु:खी झालो आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो’, अशा शब्दांत रजनीकांत यांनी शोक व्यक्त केला.