
‘द काश्मीर फाइल्स’नंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे. आधी या चित्रपटाचं नाव ‘द दिल्ली फाइल्स’ असं ठेवलं होतं, नंतर ते बदलून ‘द बंगाल फाइल्स’ असं करण्यात आलं आहे. ट्रेलरमध्ये हिंदू-मुस्लीम यांच्यातील दंगल आणि मन विचलित करणारी अनेक दृश्ये पहायला मिळतात.
‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात एका मुस्लीम आमदाराच्या कुटुंबाच्या डिनरच्या दृश्याने होते. जेवणाच्या टेबलावर बसलेला आमदार त्याच्या मुलाशी बोलतो, “जर 2050 मध्ये तू अल्पसंख्याक गटातून पहिला पंतप्रधान झालास तर काय होईल?” यानंतरची कथा जुन्या काळातील आहे. बंगालमध्ये दोन संविधानांचं पालन केलं जातं, हे राज्य दोन भागात विभागलं गेलं आहे- एक हिंदूंचा आणि दुसरा मुस्लिमांचा, असा संवाद पुढे ऐकायला मिळतो. स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना यांच्यात बंगालबद्दल चर्चा होते. जिना बंगालचा एक भाग मिळवू इच्छितात. यामुळे शहरात दंगली होतात. हिंदू आणि मुस्लीम समाज एकमेकांविरुद्ध उभे ठाकतात आणि सर्वत्र हिंसाचार, द्वेष पसरतो. या ट्रेलरमध्ये मन विचलित करणारी अनेक दृश्ये पहायला मिळतात.
एकीकडे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत लोक मारले जातात, त्याचवेळी हिंदू समाज याचा बदला घेण्यासाठी लोकांना मारताना दिसून येतात. यादरम्यान बंगालचं विभाजन करण्यास स्पष्टपणे नकार दिला जातो. या घडामोडींची झलक दाखवल्यानंतर हा ट्रेलर आजच्या काळाकडे येतो. अभिनेता दर्शन कुमारचं पात्र या ट्रेलरमध्ये सवाल करतो की, ‘आपण खरंच स्वतंत्र आहोत का? जर आपण खरंच स्वतंत्र आहोत तर मग इतके असहाय्य का आहोत? देशाच्या स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही आपण अशा सामाजिक समस्यांना का तोंड देत आहोत?’
जर काश्मीरच्या कथेनं तुम्हाला दु:ख दिलं असेल तर बंगालची कहाणी तुम्हाला घाबरवेल. हा चित्रपट येत्या 5 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातील बऱ्याच कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. अनुपम खेर, पल्लवी जोशी, सिमरत कौर, मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार यांसारख्या कलाकारांनी यामध्ये काम केलंय.