76 वर्षीय अभिनेत्री पुन्हा प्रेमात, 45 वर्षांचा संसार मोडल्यानंतर बॉयफ्रेंडसोबत ‘खुल्लम खुल्ला’ प्रेम
वयाच्या 76 व्या वर्षी ही प्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा प्रेमात पडली आहे. एका रेस्टॉरंटमध्ये बॉयफ्रेंडसोबत निवांत वेळ घालवतानाचा तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 45 वर्षांच्या संसारानंतर 2017 मध्ये तिचा घटस्फोट झाला होता.

प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. सध्या एका 76 वर्षीय अभिनेत्रीला पाहून हीच गोष्ट खरी ठरताना दिसत आहे. ‘द डेव्हिल विअर्स प्राडा 2’ या चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन करणारी अभिनेत्री मेरिल स्ट्रीप तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. बऱ्याच वर्षांनंतर मेरिलच्या आयुष्यात प्रेम परतलंय आणि वयाच्या 76 व्या वर्षी प्रेमात पडल्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. सहअभिनेता मार्टिन शॉर्टसोबत मेरिल स्ट्रीपचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोघांनी ‘ओन्ली मर्डर इन द बिल्डिंग’ या हिट सीरिजमध्ये एकत्र काम केलं होतं. या सीरिजनंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता बऱ्याच काळानंतर मेरिल आणि मार्टिन पुन्हा एकदा डिनर डेटवर एकत्र दिसले.
एक्स (ट्विटर) अकाऊंटवर मेरिल आणि मार्टिन यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये दोघं एकमेकांच्या बाजूला बसून निवांत वेळ घालवताना दिसत आहेत. या फोटोमध्ये मेरिल स्ट्रीपने मार्टिनच्या खांद्यावर डोकं टेकवलं आहे. दोघं मोबाइलमध्ये काहीतरी बघत आहेत. एका युजरने हा फोटो पोस्ट करत लिहिलं, ‘मी लंडनमध्ये काही वेळ घालवला होता. तिथल्या एका रेस्टॉरंटमध्ये मला मेरिल स्ट्रीप आणि तिचा पार्टनर एकत्र दिसले. त्यांच्यापासून थोड्या अंतरावर बसून मी जेवत होते.’ या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मेरिल आणि मार्टिन हे 2024 पासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यानंतर ते गोल्डन ग्लोब अवॉर्ड्ससह इतर काही कार्यक्रमांमध्येही एकत्र दिसले होते. परंतु मार्टिनने मेरिलसोबतच्या रोमँटिक रिलेशनशिपच्या चर्चांना फेटाळलं होतं. तर मेरिलनेही त्याला जवळचा मित्र असल्याचं म्हटलं होतं.
मेरिलने याआधी डॉन ग्रमरशी लग्न केलं होतं. जवळपास 45 वर्षांच्या संसारानंतर दोघं विभक्त झाले. 2017 मध्ये त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर 2023 मध्ये मेरिलच्या जवळच्या एका व्यक्तीने विभक्त झाल्याच्या वृत्तांवर शिक्कामोर्तब केला होता. मेरिल आणि डॉन यांनी 1978 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना चार मुलं आहेत.