हे गाणं ऐकण्यासाठी लोक बघायचे बुधवारची वाट, 29 वर्षांपासून सुपरहिट, ऐकताच होतो पार्टीचा मूड
29 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, ज्याला पाहण्यासाठी लोक आठवडाभर बघायचे बुधवारची वाट. उदित नारायण -पूर्णिमा यांच्या आवाजामुळे गाणं ठरलेलं प्रचंड लोकप्रिय. आजही ऐकताच होतो पार्टीचा मूड.

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक गाणी अशी आहेत, जी प्रदर्शित होताच त्यांची इतकी क्रेझ वाढते की लोक ते पुन्हा -पुन्हा ऐकतात. असेच एक ९०च्या दशकातील गाणं ज्याने केवळ चित्रपटाची रंगत वाढवली नाही तर प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचाही भाग बनले. याच यादीतील एक लोकप्रिय गाणं म्हणजे ‘सोना कितना सोना है’. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हीरो नंबर 1’ या चित्रपटातील या गाण्याने त्याकाळी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. गोविंदा आणि करिश्मा कपूर यांची जबरदस्त केमिस्ट्री, मजेशीर बोल आणि दोघांचा डान्स यामुळे हे गाणं आजही प्रेक्षकांच्या आवडीचं आहे.
डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘हीरो नंबर 1’ मध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत होते. कादर खान, परेश रावल, शक्ती कपूर, हिमानी शिवपुरी आणि राकेश बेदी यांसारख्या कलाकारांनीही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. गोविंदा-करिश्माची ऑनस्क्रीन जोडी त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाली होती आणि या चित्रपटाने त्यांच्या जोडीची लोकप्रियता आणखी वाढवली.
‘सोना कितना सोना है’ या गाण्याला उदित नारायण आणि पूर्णिमा यांनी आवाज दिला होता. आनंद-मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे बोल समीर यांनी लिहिले होते. गोविंदाच्या खट्याळ अंदाजाला उदित नारायण यांचा आवाज अगदी साजेसा ठरला, तर करिश्माच्या भूमिकेला पूर्णिमाच्या आवाजाने वेगळीच ऊर्जा दिली.
गाणं ऐकताच होतो पार्टीचा मूड
त्या काळात ‘चित्रहार’सारख्या लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमांमुळे अशी गाणी घराघरात पोहोचत होती. ‘सोना कितना सोना है’देखील त्याला अपवाद नव्हते. गाण्याची धून आणि हुक स्टेप्स इतक्या लोकप्रिय झाल्या की आजही 90 च्या दशकातील थीम पार्ट्यांमध्ये हे गाणं आवर्जून वाजवलं जातं.
विशेष म्हणजे, जवळपास तीन दशकांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. जुन्या पिढीसाठी हे गाणं 90 च्या दशकातील आठवणींना उजाळा देतं, तर नव्या पिढीसाठी ते एक भन्नाट रेट्रो डान्स नंबर बनलं आहे. गाणं सुरू होताच पार्टीचा मूड तयार होतो, हेच त्याच्या कायमस्वरूपी लोकप्रियतेचं सर्वात मोठं उदाहरण आहे.