
Bollywood Actor : चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या मानधनाबाबत नेहमीच मोठमोठ्या आकड्यांची चर्चा सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये होत असते. या आकड्यांवरूनच एखाद्या कलाकाराची स्टार पॉवरही मोजली जाते. सध्या अशाच एका दिग्गज अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. ज्याने एका दिवसाच्या शूटिंगसाठी तब्बल 18 कोटी रुपये मानधन घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा अभिनेता ना अमिताभ बच्चन, ना शाहरुख खान, ना सलमान खान आणि ना अमिर खान. हा अभिनेता म्हणजे दक्षिण चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार कमल हासन.
71 वर्षांच्या वयातही कमल हासन यांचा अभिनय आणि अॅक्शन चाहत्यांना तितकाच प्रभावी वाटतो. त्यांच्या कामाचा प्रभाव आजही तितकाच कायम आहे. अलीकडेच त्यांच्या मानधनाबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. माहितीनुसार, Kalki 2898 AD या चित्रपटासाठी कमल हासन यांना एका दिवसाचे जवळपास 18 कोटी रुपये मिळाले. हा दावा चित्रपट निर्माता आणि अभिनेता युगी सेतु यांनी एका मुलाखतीदरम्यान केला आहे.
फक्त 10 दिवसांच्या शूटिंगसाठी 150 कोटी
युगी सेतू यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल हासन यांना सुरुवातीला 20 दिवसांच्या कॉलशीटसाठी सुमारे 150 कोटी रुपये देण्यात येणार होते. मात्र नंतर माहिती मिळाली की त्यांनी या चित्रपटासाठी फक्त 10 दिवस शूटिंग केले. यामुळे प्रत्यक्षात त्यांना एका दिवसासाठी जवळपास 15 ते 18 कोटी रुपये मिळाले. भारतीय चित्रपटसृष्टीत एका दिवसासाठी मिळालेल्या मानधनाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा मानला जात आहे.
दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘कल्कि 2898 AD’ हा 2024 मधील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक ठरला. या चित्रपटाने जगभरात 1000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.
या सायन्स-फिक्शन चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण आणि कमल हासन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. कमल हासन यांनी या चित्रपटात देवासारख्या शक्ती असलेल्या खलनायकाची भूमिका साकारली होती.
‘कल्कि’च्या दुसऱ्या भागाची तयारी
‘कल्कि 2898 AD’ हा ‘कल्कि सिनेमॅटिक युनिव्हर्स’ची सुरुवात मानला जात आहे. ज्याची प्रेरणा हिंदू पुराणकथांमधून घेतली आहे. सध्या या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू असल्याचे सांगितले जाते.