
मराठी सिनेसृष्टीत नात्यांच्या हळुवार धाग्यांनी विणलेला एक हृदयस्पर्शी चित्रपट येत्या महिला दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्च २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर येत आहे. यामध्ये तीन महत्त्वाच्या अभिनेत्रींच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे एक पोस्टर नुकतंच प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
तिघी हा चित्रपट प्रामुख्याने आई आणि मुलींच्या नात्यातील अनोखी गुंतागुंत आणि न बोललेल्या भावनांच्या प्रवासावर भाष्य करणार आहे. यात जीवनातील अनेक क्षण असे असतात, जिथे भावना मनात दडलेल्या राहतात. ‘तिघी’ ही कथा याच न सांगितलेल्या भावना, आठवणी आणि काही अंतर्मुख करणाऱ्या क्षणांवर आधारित आहे. या चित्रपटाचे मध्यवर्ती कथानक तिघींच्या जगण्यातलं चौथं पान उलगडते. या तीन महत्त्वपूर्ण महिलांच्या आयुष्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन, त्यांचे बदलत्या काळातील भावनिक चढ-उतार आणि त्यांच्यातील खास नात्याचा सुंदर वेध दिग्दर्शिका जीजिविषा काळे यांनी घेण्याचा प्रयत्न केल आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होत असल्याने हा चित्रपट स्त्रियांच्या संवेदनशील प्रवासाची एक सखोल झलक प्रेक्षकांना दाखवेल, अशी अपेक्षा आहे. दिग्दर्शिका जीजिविषा काळे यांनी चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले, “‘तिघी’ हा आई-मुलींच्या नात्यातील आतल्या आवाजांचा प्रवास आहे. रोजच्या धावपळीत ज्या भावना व्यक्त करता येत नाहीत, त्या सगळ्या या कथेतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.”
या चित्रपटाला सशक्त अभिनय क्षेत्रातील तीन प्रमुख अभिनेत्रींची साथ मिळाली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर, अभिनेत्री नेहा पेंडसे बायस आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या तिघींच्या एकत्रित अभिनयामुळे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती टीम मजबूत आणि अनुभवी आहे. जीजिविषा काळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती शार्दूल सिंह बायस, नेहा पेंडसे बायस, निखिल महाजन, सुहृद गोडबोले आणि स्वप्निल भंगाळे यांनी केली आहे.
“आई आणि मुलीचे नाते अत्यंत खास आणि नितांत सुंदर असते. आपण नेहमी जो त्याग आणि काळजी पाहतो, ‘तिघी’ ही त्याच घराची, त्याच नात्यांची गोष्ट आहे. हा चित्रपट प्रत्येक कुटुंबाला भावनिकरित्या जोडून ठेवेल.” असे निर्माते शार्दूल सिंह बायस यांनी नमूद केले. शार्दूल सिंह बायस, नेहा पेंडसे बायस आणि निखिल महाजन ही निर्मिती फळी पुन्हा एकदा एकत्र आल्यामुळे प्रेक्षकांना एक भावस्पर्शी आणि कलात्मक अनुभव मिळेल अशी आशा आहे.