अखेर तिलक वर्मा – श्रीलीला यांच्या डेटिंगच्या चर्चांमागील सत्य समोर
तिलक वर्मा सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. टीममधील त्याच्या परफॉर्मन्ससोबतच अभिनेत्री श्रीलीलासोबत त्याच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा होत आहेत.

क्रिकेटर आणि कलाविश्व यांचं फार जुनं समीकरण आहे. कलाविश्वातील सेलिब्रिटींसोबत क्रिकेटर्सचं नावं अनेकदा जोडलं गेलं. त्यापैकी काहींनी एकमेकांना डेट केलं, काहींचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं, तर काहींच्या नात्याच्या फक्त चर्चा झाल्या. असंच काहीसं सध्या मुंबई इंडियन्स (MI) आणि टीम इंडियाचा युवा फलंदाज तिलक वर्माबद्दल ऐकायला मिळत आहे. तिलक वर्मा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यामागचं कारण म्हणजे एक व्हायरल व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादव गंमतीने म्हणतो की, “तिलक प्रेमात पडला आहे.” हा व्हिडीओ समोर येताच चाहत्यांनी लगेचच त्याचा संबंध तेलुगू अभिनेत्री श्रीलीलाशी जोडला आणि या दोघांच्या डेटिंगच्या अफवा सोशल मीडियावर होऊ लागल्या. या चर्चांवर आता या प्रकरणाशी संबंधित एका जवळच्या सूत्राने प्रतिक्रिया दिली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, तिलक वर्मा हेडफोन लावून हॉटेलच्या लॉबीमधून चालताना दिसत आहे. त्याचवेळी सूर्यकुमार यादव मागून ‘प्रेमात आहे’ असं म्हणत त्याला चिडवताना दिसत आहे. सूर्यकुमारने यावेळी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी नेटकऱ्यांनी लगेचच याचा संबंध अभिनेत्री श्रीलीलाशी जोडला आहे. यामागचं कारण म्हणजे जेव्हा श्रीलीला तिच्या आईला घेऊन तिरुमला मंदिरात दर्शनासाठी गेली होती, त्याच वेळी तिलक वर्मासुद्धा त्याच्या कुटुंबीयांसोबत तिथे दिसला होता, असं म्हटलं जातं. इतकंच नाही तर श्रीलीलाची आई डॉ. स्वर्णलता या 14 मे 2026 रोजी धर्मशाळा इथं पंजाब किंग्सविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या आयपीएल सामन्याला उपस्थित होत्या. याच सामन्यात तिलक वर्माने नाबाद 75 धावा करून मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिली होता.
या सर्व चर्चांवर आता सूत्रांकडून माहिती समोर येत आहे. या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं म्हटलं गेलं आहे. “तिलक वर्मा आणि श्रीलीला यांच्याबद्दल होत असलेल्या चर्चा पूर्णपणे तथ्यहीन आणि खोट्या आहेत. हे दोघं कधीच एकमेकांना भेटले नाहीत किंवा एकमेकांशी बोलले नाहीत. या चर्चांमध्ये काहीच सत्य नाही आणि अशा खोट्या कथा तथ्यांच्या पडताळणीशिवाय पसरवू नका”, असं सूत्रांनी म्हटलंय.
दुसरीकडे सोशल मीडियावर असाही दावा केला जातोय की श्रीलीला एका क्रिकेट मॅचला उपस्थित होती आणि त्यावेळी तिच्या टीममधील एका व्यक्तीने ‘तिलक’ नावाची जर्सी घातली होती. यामुळे तिलक वर्मा आणि श्रीलीला यांच्या नात्याबद्दल चर्चांना उधाण आलं. आयपीएल 2026 मधील आपल्या प्रभावी कामगिरीसोबतच तिलक वर्मा सोशल मीडियावर तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय आहे.