मोठी बातमी! मेळघाटातील अदानींच्या प्रकल्पाला मोठा विरोध, काँग्रेसच्या नेत्यानं दंड थोपटले
Adani hydro project melghat : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये अदानी समूहाच्या 1,500 मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्पावरून वाद निर्माण झाला आहे. नेमकं काय घडलं?

अमरावतीतून मोठी बातमी समोर आली आहे. मेळघाट मधील अदानी वीज निर्मिती प्रकल्पाचे काम थांबवा अशी मागणी माजी आमदार राजकुमार पटेल यांनी केली आहे. राजकुमार पटेल यांनी ज्या ठिकाणी विद्युत प्रकल्प निर्मिती होते त्या ठिकाणी धडक भेट दिली आहे. मागील मार्च महिन्यापासून आडनदी परिसरात अदानी समूहाच्या हायड्रो पंप प्रकल्पाचे काम सुरू आहे.
मागील अनेक दिवसांपासून या कामाची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याच अनुषंगाने आज राजकुमार पटेल आणि रोहित पटेल यांनी कार्यकर्त्यांसह मडकी गावाजवळ असलेल्या प्रकल्पाच्या कॅम्पला भेट देऊन तेथील संपूर्ण कामाची पाहणी केली व माहिती जाणून घेतली.
काय म्हणाले राजकुमार पटेल?
आमच्या मेळघाटातील लोकांनी जमीन जर या प्रकल्पाच्या आसपास आहे तरी त्यांना ना विहिर खोदता येते. ना कोणतीही ब्लास्टिंग करता येते. ना त्यांना कोणता बोअरवेल खोदता येतो. मेळघाटातील लोकांना इतकी पाबंदी आणि अदानीला पूर्णपणे मोकळीक. त्यांना मशीनसह ड्रील करण्यालाही कोणतीही बंदी नाही. इथले एसडीएम यांच्यासोबत बसत नाहीत. समोरासमोर बसत नाहीत. फॉरेस्टचे अधिकारीही येत नाहीत. समोरासमोर बसून शांततेत चर्चा व्हावी, आम्हाला काहीतरी मार्ग द्यावा, आमचा या प्रकल्पाला विरोध नाही. आणि आज आम्ही त्यांना सांगितलं की, ड्रील बंद करा, त्यानुसार त्यांनी ऐकल, ड्रिल बंद केली, असं राजकुमार पटेल यावेळी बोलताना म्हणाले.
नेमकी काय आहे मागणी?
आजही मेळघाटातील २२ गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही, सुमारे ४० गावांना जोडणारे रस्ते अजूनही कच्चे (मातीचे) आहेत, आणि शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर विहिरी किंवा बोअरवेल खोदण्यासाठी वन विभागाकडून परवानगी नाकारली जाते. मग, ‘अदानी प्रकल्पा’च्या सर्वेक्षणासाठी इतक्या तत्परतेने परवानगी कशी काय दिली गेली?
या दुटप्पी धोरणाचा निषेध करत, माजी आमदार राजकुमारजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली, आज चिखलदरा तालुक्यातील ‘आडनदी’ येथे जाऊन अदानी प्रकल्पाशी संबंधित कामांची पाहणी केली आणि हे काम थांबवण्यास भाग पाडले.
स्पष्ट मागणी आहे की, सर्वप्रथम मेळघाटातील २२ गावांमध्ये वीजपुरवठा केला जावा, ग्रामीण भागांत पक्के रस्ते बांधले जावेत आणि शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळण्याचा अधिकार मिळावा.
स्थानिक रहिवाशांसाठी ‘जनसुनावणी’ (public hearing) पूर्ण होईपर्यंत आणि वन विभागासह सर्व आवश्यक परवानग्या व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय, अदानी प्रकल्पाचे कोणतेही पुढील काम सुरू होऊ नये. मेळघाटातील लोकांचे हक्क आणि त्यांच्या विकासाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. हा संघर्ष सुरूच राहील, अशी पोस्ट यावेळी राजकुमार पटेलांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
दरम्यान, मेळघाट येथील अदानी समूहाचा प्रस्तावित प्रकल्प हा १,५०० मेगावॉट क्षमतेचा ‘उदंचन जलविद्युत प्रकल्प’ (Pumped Storage Hydro Project) आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात असलेल्या आडनदी परिसरात हा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे.
