Trisha Krishnan : थलपती विजयसोबत त्रिशा कृष्णन राजकारणात उतरणार? जयललिता यांच्याशी तुलना
Trisha Krishnan : अभिनेत्री त्रिशा कृष्णन राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू असून अभिनेत्रीच्या समर्थकांनी तिची तुलगा माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यासोबत केली आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या चित्रपटांनी आणि उत्कृष्ट अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकल्यानंतर, तिचे चाहते तिला राजकारणातही पाहू इच्छितात. काही चाहत्यांनी तर तिची तुलना तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्याशी करायला सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर, समर्थकांनी त्रिशाच्या नावानं एक नवीन संघटना स्थापन केली आहे आणि तिला एक अनोखी राजकीय पदवी दिली आहे. या उपक्रमामुळे, त्रिशा भविष्यात तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करेल का, अशा चर्चा होत आहेत. पण, अभिनेत्रीकडून तिच्या राजकीय प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
त्रिशाच्या नावाची संघटना
त्रिशाच्या नावानं एक नवीन संघटना स्थापन करण्यात आली आहे, तिला ‘इलैया पुरची थलायवी’ म्हटलं जात आहे. त्रिशा कृष्णनच्या काही समर्थकांनी ‘इलैया पुरची थलायवी त्रिशा पेरावई’ नावाचा एक मंच सुरू केला आहे. या संघटनेच्या माध्यमातून, चाहत्यांनी आशा व्यक्त केली आहे की, त्रिशा भविष्यात राजकारणात प्रवेश करेल आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्यासोबत मिळून काम करेल.
फोरमच्या सदस्यांचा विश्वास आहे की, त्रिशाचं व्यक्तिमत्व जयललिता यांच्यासारखं आहे आणि तिच्यातही तसेच गुण आहेत. फोरमने जारी केलेल्या एका पत्रकात म्हटलं आहे की, संस्थेला विश्वास आहे की, त्रिशा एक दिवस मुख्यमंत्री विजय यांच्यासोबत राजकीय प्रवासाला सुरुवात करेल. समर्थकांचा दावा आहे की, ते दोघं मिळून तामिळनाडूच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. संस्थेनं म्हटलं आहे की, जेव्हा विजय आणि त्रिशा राजकारणात एकत्र पुढे जातील, तेव्हा राज्याचा विकास वाढेल. चाहत्यांनी विजय यांच्या नेतृत्वाखाली टीव्हीके सरकारलाही पाठिंबा दर्शवला आहे. त्रिशाच्या समर्थकांनी तिची तुलना केवळ जयललितांच्या नावाशी आणि पदाशीच नव्हे, तर माजी मुख्यमंत्र्यांच्या कामाशीसुद्धा केली आहे.
मात्र, त्रिशानं स्वतः कोणत्याही राजकीय पक्षात सामील होण्याची घोषणा केलेली नाही किंवा विजयसोबतच्या तिच्या राजकीय प्रवासाला दुजोराही दिलेला नाही.