Chandrakant Patil: ‘खरातचे पाय धरणारे चंद्रकांतदादा’, धंगेकरांनी डिवचलं; चंद्रकांत पाटलांचे मौन, प्रश्न विचारताच…
देवेंद्रजी, न्यायाची भूमिका घेताना व्यक्ती पाहून निर्णय होऊ नये. रूपाली चाकणकर यांच्याबाबतीत जो निकष लावला, तोच चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीतही लावला पाहिजे. चंद्रकांतदादांसाठी खरात बाबाने वेगळा टेबल मांडला होता का..? असा खोचक सवाल धंगेकरांनी केला होता.

रवी खरात, प्रतिनिधी: ‘भोंदु खरातसाठी छत्री धरल्यामुळे रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले, मग खरातचे पाय धरणारे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीत वेगळा न्याय का?’ असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केला होता. रविंद्र धंगेकर यांच्या या टिकेनंतर आता चंद्रकांत पाटील काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते, मात्र चंद्रकांत पाटील यांनी धंगेकरांना उत्तर देणे टाळले आहे.
धंगेकरांच्या टिकेवरुन चंद्रकांत पाटलांचे मौन!
समोर आलेल्या माहितीनुसार, जळगाव विमानतळावर मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रसारमाध्यमांनी रविंद्र धंगेकर यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टसंदर्भात प्रश्न विचारला. धंगेकर यांच्या या पोस्टवर चंद्रकांत पाटील यांची भूमिका काय, अशी विचारणा पत्रकारांनी केली. मात्र, या प्रश्नावर प्रतिक्रिया देणे चंद्रकांत पाटील यांनी टाळले. पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतरही त्यांनी या विषयावर कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे रविंद्र धंगेकर यांच्या ‘X’ पोस्टसंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी सध्या मौन बाळगल्याचे पाहायला मिळाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचेही टीकास्त्र
रविंद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या टिकेवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. फक्त चंद्रकांत पाटीलच नाही तर अनेक मंत्रीसुद्धा खरातकडे जात होते, खुद्द एकनाथ शिंदेंचे सुद्धा फोटो व्हायरल झाले होते. खरात हा भोंदु आहे. शिव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये भोंदूच्या दरबारात जाणाऱ्यांनी निवृत्ती घेतली पाहिजे. राजकारण सोडले पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे. तरच आपल्याला शाहू महाराजांचे आणि फुलेंचे बाबासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार आहे, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत.
काय आहे रविंद्र धंगेकरांचे ट्वीट!
खरात प्रकरणात खरातसाठी छत्री धरल्यामुळे रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले, मग खरातचे पाय धरणारे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीत वेगळा न्याय का? देवेंद्रजी, न्यायाची भूमिका घेताना व्यक्ती पाहून निर्णय होऊ नये. रूपाली चाकणकर यांच्याबाबतीत जो निकष लावला, तोच चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीतही लावला पाहिजे. चंद्रकांतदादांसाठी खरात बाबाने वेगळा टेबल मांडला होता का..? असा खोचक सवाल धंगेकरांनी केला होता.
