Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा सोनाक्षी सिन्हाच्या ड्रायव्हरला दणका, रद्द केला दुकानाचा परवाना

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांची अन्न सुरक्षा मोहीम जोरात सुरू आहे. याचा फटका आणखी एका प्रसिद्ध मोमो दुकानाला बसला आहे. एफडीएनं सोनाक्षी सिन्हा आणि शाहिद कपूरच्या एक्स ड्रायव्हरच्या मालकीच्या दुकानाचा परवानाही निलंबित केला आहे.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा सोनाक्षी सिन्हाच्या ड्रायव्हरला दणका, रद्द केला दुकानाचा परवाना
| Updated on: Oct 06, 2026 | 6:23 PM

तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी सणासुदीच्या काळात होणाऱ्या अतिक्रमणांविरोधातील आपल्या तीव्र मोहिमेचा भाग म्हणून आणखी आठ खाद्यगृहांचे परवाने निलंबित केले. या दुकानांमध्ये मुंबईतील सर्वात प्रसिद्ध मोमो दुकानांपैकी एक असलेल्या, अंधेरी पश्चिममधील सूरज लामा मोमोजच्या मूळ शाखेचा समावेश होता. त्याच्या मालकाचा बॉलिवूडशी एक रंजक संबंध आहे. सूरज लामा वयाच्या १४ व्या वर्षी नोकरीच्या शोधात दार्जिलिंगमधील आपलं मिरिक हे गाव सोडून मुंबईत आला. काही किरकोळ कामं केल्यानंतर, सूरज एक सेलिब्रिटी ड्रायव्हर बनला. त्यानं २५ वर्षे काम केलं. त्यानं सोनाक्षी सिन्हा आणि शाहिद कपूर यांसारख्या कलाकारांसोबत काम केलं आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्ससारख्या मोठ्या बॅनरसाठी ड्रायव्हिंग केलं.

नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला

Loading...

काही वर्षांपूर्वी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या एका मुलाखतीत सूरज म्हणाला होता की, ‘मी खूप मेहनतीनं काम केलं आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या लोकांना कुटुंबासारखं वागवलं, पण कधीकधी मला समान वागणूक मिळाली नाही. ही गोष्ट मला खटकली. मी एका अभिनेत्याला सेटवर घेऊन गेलो होतो. तिथे एक लहान मूल होतं, ज्याला त्या अभिनेत्यासोबत फोटो काढायचा होता आणि तो खूप वेळ वाट पाहत होता. मी त्या मुलाला मदत करण्याचा विचार केला, पण जेव्हा मी अभिनेत्याला त्याच्या इच्छेबद्दल सांगितलं, तेव्हा त्यानं नकार दिला. मला ते आवडलं नाही.’

ओला आणि उबरसारख्या ॲप-आधारित कॅब सेवांच्या वाढीमुळे सूरजला २०१७ मध्ये मोमोज विकायला सुरुवात करण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे, त्यानं नोकरी सोडून, आपली मोटारसायकल विकून आणि एक सायकल विकत घेण्याचा निर्णय घेतला, ज्याचा वापर करून त्यानं एक पॉप-अप दुकान सुरू केलं. सुरजनं पत्नीसह व्यवसाय सुरू केला.

सूरज म्हणाला, ‘मागे वळून पाहताना वाटतं की, तो एक मोठा धोका होता. आम्ही दोघं आमच्या आधीच्या नोकरीतून जवळपास 30,000 रुपये कमवत होतो, त्यापैकी निम्मे घरखर्चासाठी लागायचे आणि बाकीचे आम्ही वाचवत होतो. पण, आमच्या व्यवसायाला यश मिळालं.’ त्या वेळी मुंबईत मोमोज उत्तर भारताइतके सहज उपलब्ध नसल्यामुळे, सूरजचा चांगला व्यवसाय झाला.

२०२४ मध्ये एका मुलाखतीत सूरज म्हणालेला, ‘गुणवत्ता टिकवून ठेवणं महत्त्वाचे आहे. आज मुंबईत आमचं एक सेंट्रल किचन आहे, आणि ते माझी पत्नी सांभाळते. तेथील २५ लोकांची टीम दररोज अंदाजे १६,००० वेगवेगळ्या प्रकारचे मोमोज बनवते.’

अन्नाच्या गुणवत्तेवर इतका भर देण्याचा दावा करूनही, एफडीएनं ‘सूरज लामा मोमोज’चा परवाना निलंबित केला आहे. अन्न हाताळणी आणि साठवणुकीच्या पद्धती, स्वच्छता आणि दूषितीकरण रोखण्यासाठीच्या सुरक्षा उपायांमध्ये त्रुटी आढळल्या. लागू असलेल्या अन्न सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या त्रुटी इतक्या गंभीर होत्या की, यावर तात्काळ कारवाई करणं आवश्यक होतं, असं त्यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us