Avishkar Darvhekar : त्वचा फाटणं, वेदनादायी फोड अन्…मराठी अभिनेत्यानं केलेला दुर्मिळ आणि गंभीर आजाराचा सामना, इंडस्ट्रीतून होता गायब
Avishkar Darvhekar : मराठी अभिनेता आविष्कार दारव्हेकरनं एका दुर्मिळ आणि गंभीर आजाराचा सामना केलेला. अभिनेता अनेक वर्ष इंडस्ट्रीतून गायब होता.

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता आविष्कार दारव्हेकर गेल्या काही वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर होता. ‘बिग बॉस मराठी 3’ मध्ये सहभागी झाल्यानंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला होता. त्यामुळे आता अभिनेता मालिकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये कधी दिसणार, याची चाहत्यांना उत्सुकता होती. मात्र, बिग बॉसनंतर आविष्कार अचानक मनोरंजनविश्वातून गायब झाला. आविष्कार इंडस्ट्रीतून गायब होण्याचं कारण आता समोर आलं असून, एका दुर्मिळ आणि गंभीर आजारामुळे त्याला मोठ्या संकटाचा सामना करावा लागलेला.
आविष्कार दारव्हेकरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितलं. बिग बॉस मराठी 3 नंतर त्याला ‘पेम्फिगस व्हल्गॅरिस’ (Pemphigus Vulgaris) या दुर्मिळ त्वचारोगाचं निदान झालं होतं. या आजारामुळे त्याला प्रचंड शारीरिक त्रास सहन करावा लागला. शरीरावरील त्वचा फाटणं, वेदनादायी फोड येणं आणि त्यातून रक्तस्राव होणं अशा गंभीर समस्यांना त्याला सामोरं जावं लागलं. या आजाराची तीव्रता इतकी होती की, त्याला अनेक महिने उपचार घ्यावे लागले. मुंबईतील केईएम रुग्णालयात तब्बल अडीच महिने तो ऍडमिट होता. अनेक डॉक्टरांच्या टीमनं अभिनेत्यावर उपचार केले. अखेर डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं आणि आविष्कार हळूहळू या आजारातून सावरला.
या कठीण प्रवासात त्याला डॉक्टरांसोबतच आई-वडील आणि काही जवळच्या मित्रांचीही मोलाची साथ मिळाली. सोनचाफा प्रोडक्शनला दिलेल्या मुलाखतीत त्यानं आपल्या या अनुभवांबद्दल सांगितलं. आयुष्यात आलेल्या या मोठ्या संकटावर मात केल्यानंतर आविष्कारनं पुन्हा एकदा अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. आगामी काळात पुन्हा एकदा मनोरंजनविश्वात सक्रिय होण्याची इच्छा त्यानं व्यक्त केली आहे.
दरम्यान, आविष्कार दारव्हेकर हा ज्येष्ठ नाटककार आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या अजरामर नाटकाचे लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांचा नातू आहे. नागपूरमध्ये जन्मलेल्या आविष्कारला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यानं विविध एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. 2004 च्या सुमारास त्यानं व्यावसायिक अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘आभाळमाया’, ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘दुर्वा’ आणि ‘तू माझा सांगाती’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून अभिनेत्याला प्रेक्षकांची पसंती मिळवली. याशिवाय ‘मान सन्मान’, ‘मृत्युपत्र’, ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’, ‘ती आणि इतर’ आणि ‘देवा शपथ खोटं सांगेन खरं सांगणार’ अशा चित्रपटांमध्येही त्यानं भूमिका साकारल्या आहेत. अभिनय कारकिर्दीसोबतच अभिनेत्री स्नेहा वाघसोबतच्या लग्नामुळे आणि घटस्फोटामुळेही आविष्कार चर्चेत राहिला होता.
