Kranti Redkar: शूटिंगच्या एक दिवस आधी आईला कॅन्सरचं निदान; क्रांती रेडकरने सांगितला कठीण काळ
'मैत्रेया' चित्रपटाचं काम सुरू होण्याच्या एक दिवस आधीच क्रांती रेडकरच्या आईला कर्करोगाचं निदान झालं होतं. आता आई कर्करोगमुक्त झाली असली तरी अपघातात पायाला फ्रॅक्चर झाल्याने त्यांचं चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित राहण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं.

Kranti Redkar Mother: मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर सध्या तिच्या ‘मैत्रेया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने क्रांतीने तिच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाचा खुलासा केला आहे. चित्रपटाचं काम सुरू होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी तिच्या आईला कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यामुळे गेल्या काही काळापासून ती आईसोबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत नव्हती. मात्र, आता तिच्या आईने कर्करोगावर मात केली असून त्या कर्करोगमुक्त झाल्याची आनंदाची बातमी क्रांतीने दिली आहे. यासोबतच आईचं एक स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंतही तिने व्यक्त केली आहे.
आईला कॅन्सरचं निदान झालं अन्…
क्रांती रेडकरने ‘मैत्रेया’ चित्रपटाच्या प्रीमियरला जाण्यापूर्वी आईसोबत एक व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओ तिने आता सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याला ‘माझ्याकडे आई आहे. माझी सुखाची व्याख्या’ असं भावनिक कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये क्रांती म्हणते, ‘मैत्रेयासाठी मी ज्या दिवशी काम सुरू केलं, त्याच्या एक दिवस आधी माझ्या आईला कर्करोगाचं निदान झालं होतं. तुम्ही मला सारखे विचारायचे की मी आईसोबत व्हिडीओ का पोस्ट करत नाही? कारण त्यावेळी आमची मॅडम कर्करोगाशी झुंज देत होती. पण ही खूप आनंदाची गोष्ट आहे की ती आता कर्करोगमुक्त आहे.’
View this post on Instagram
आई कर्करोगमुक्त झाल्यानंतर कुटुंबात आनंदाचं वातावरण असतानाच आणखी एक संकट आलं. ‘मैत्रेया’च्या म्युझिक प्रीमियरला उपस्थित राहण्यासाठी तिची आई आली होती. मात्र, तिथे त्यांचा अपघात झाला आणि पायाला फ्रॅक्चर झालं. त्यानंतर त्यांच्या पायावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यामुळे चित्रपटाच्या मुख्य प्रीमियरला आईला उपस्थित राहता येणार नसल्याची खंत क्रांतीने व्यक्त केली. यावर तिच्या आईनेही अतिशय भावूक प्रतिक्रिया दिली. ‘अपूर्ण नाही राहिलंय. माझ्या मनातून मी चित्रपट बघणार ना आणि आशीर्वादही देणार. एवढा सुंदर चित्रपट मी मिस करेन. मी इन्स्टाग्रामवर नेहमी बघते,’ असं त्या म्हणाल्या.
लेकीच्या मेहनतीचं आई-वडिलांकडून कौतुक
या व्हिडीओमध्ये क्रांतीच्या आईने ‘मैत्रेया’ चित्रपटासाठी तिने घेतलेल्या मेहनतीचं भरभरून कौतुक केलं आहे. हा चित्रपट खूप चालेल आणि कोट्यवधींचा व्यवसाय करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर क्रांतीचे वडीलही चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी लेकीचा अभिमान असल्याचं सांगितलं. प्रीमियरला उपस्थित असलेल्या भारती आचरेकर यांच्यासह इतर कलाकारांनीही क्रांतीचं आणि चित्रपटाचं कौतुक केलं.
‘काकण’नंतर क्रांतीचा ‘मैत्रेया’
दरम्यान, क्रांती रेडकर दिग्दर्शित ‘मैत्रेया’ हा चित्रपट 20 नोव्हेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मैत्री आणि प्रेम या नात्यांवर आधारित या चित्रपटात समर खळतकर, आयुषी भावे, स्काय आणि रुची जाईल यांसारखे कलाकार आहेत. ‘काकण’नंतर क्रांतीने दिग्दर्शित केलेला हा दुसरा चित्रपट आहे.
