ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंह यांचं निधन, महाभारत मालिकेत साकारली खास भूमिका

90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आशा सिंह यांचं निधन. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारा होत्या. त्यांनी महाभारत मालिकेत खास भूमिका केली होती.

ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंह यांचं निधन, महाभारत मालिकेत साकारली खास भूमिका
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 23, 2026 | 5:40 PM

बॉलिवूड आणि हिंदी टीव्ही विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बी. आर. चोप्रा यांच्या गाजलेल्या ‘महाभारत’ मालिकेसह अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंह जयसवाल यांचे निधन झाले आहे. 22 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या दीर्घकाळापासून आजारी असल्याचे सांगितले जात आहे.

आशा सिंह जयसवाल यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा आकाश सिंह यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईच्या निधनाची माहिती देताना आकाश यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा आणि सामाजिक योगदानाचा आवर्जून उल्लेख केला.

आशा सिंह जयसवाल या केवळ अभिनेत्री नव्हत्या, तर समाजसेविका आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणूनही त्यांची ओळख होती. त्या भारतातील पहिल्या महिला मिमिक्री आर्टिस्टपैकी एक म्हणून ओळखल्या जात होत्या. विशेष म्हणजे, त्या प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करण्यासाठीही परिचित होत्या. याशिवाय त्यांनी ‘आशा इव्हेंट्स अँड फिल्म्स’ या मनोरंजन व्यवस्थापन कंपनीची स्थापना केली होती.

‘महाभारत’मध्ये त्यांनी कृपीची भूमिका साकारली

आशा सिंह जयसवाल यांनी 1970 च्या दशकापासून मनोरंजन क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी विविध हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये व्यक्तिरेखा साकारल्या. मात्र, बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेतील कृपीची भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील विशेष लक्षात राहिलेली भूमिका ठरली.

‘महाभारत’मध्ये त्यांनी कृपीची भूमिका साकारली होती. कृपी ही गुरु कृपाचार्यांची बहीण, गुरु द्रोणाचार्यांची पत्नी आणि अश्वत्थामाची आई होती. या भूमिकेमुळे आशा सिंह जयसवाल यांना घराघरात ओळख मिळाली आणि त्या टीव्ही विश्वातील परिचित चेहरा बनल्या.

हिंदी मनोरंजनसृष्टीत शोककळा

मुलगा आकाश सिंह यांनी आपल्या पोस्टमध्ये आईला मेहनती आणि खंबीर महिला म्हणून श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कामाला आयुष्यात सर्वाधिक महत्त्व होते, असेही त्यांनी नमूद केले. तसेच चाहत्यांनी आणि त्यांच्या परिचितांनी सोशल मीडियावर त्यांचे काम पाहून त्यांना आठवणीत ठेवावे असे आवाहन केले.

आशा सिंह जयसवाल यांच्या निधनाने हिंदी मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनयासोबतच मिमिक्री, समाजसेवा आणि मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची आठवण कायम राहील. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वाने एक ज्येष्ठ आणि बहुआयामी कलाकार गमावला आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us