वेब सीरिज असावी तर अशी..; आयएमडीबीवर 9.1 रेटिंग, ओटीटीवर टॉपमध्ये

जवळपास पंधरा दिवसांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झालेली ही वेब सीरिज टॉप ट्रेंडिंगमध्ये पोहोचली आहे. पहिल्या चार सिझन्सच्या प्रचंड यशानंतर या सीरिजचा हा पाचवा सिझन आहे. संपूर्ण कुटुंबासोबत बसून तुम्ही या सीरिजचा आनंद घेऊ शकता.

वेब सीरिज असावी तर अशी..; आयएमडीबीवर 9.1 रेटिंग, ओटीटीवर टॉपमध्ये
टीव्हीएफची वेब सीरिज
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 21, 2026 | 3:44 PM

विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज स्ट्रीम होत असतात. यापैकी जर एखादा चित्रपट किंवा वेब सीरिज प्रदर्शित झाल्याच्या दिवसापासूनच पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होऊ लागली, तर नक्कीच त्यात काहीतरी विशेष असेल, हे सिद्ध होतं. त्यातही विशेषत: जर ती टीव्हीएफची (TVF) सीरिज असेल, तर उत्तम आशयाची खात्रीच असते. अशीच एक वेब सीरिज सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. ही सीरिज जवळपास पंधरा दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आणि तेव्हापासूनच ती पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. इतकंच नाही तर या सात एपिसोड्सच्या या सीरिजला आयएमडीबीवर 9.1 इतकी दमदार रेटिंग मिळाली आहे.

हा एक फॅमिली ड्रामा आहे आणि विशेष म्हणजे या सीरिजचा हा पाचवा सिझन आहे. गेल्या चार सिझन्सनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं होतं. या हलक्याफुलक्या सीरिजला समिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. या सीरिजचं नाव आहे ‘गुल्लक 5’. मिश्रा कुटुंबातील संतोष, शांती, अन्नू आणि अमन यांची कथा सांगणारी ही सीरिज प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. अत्यंत साध्या घरात राहणाऱ्या, मध्यमवर्गीय जीवन जगणाऱ्या आणि आर्थिक चिंता- वैयक्तिक महत्त्वाकांक्षा यांच्यात ताळमेळ साधणाऱ्या मिश्रा कुटुंबाची ही कथा आहे. या पाचव्या सिझनचे एकूण सात एपिसोड्स आहेत. अमनचा ज्योतिष अभ्यास, अन्नूचं गुप्त अपार्टमेंट आणि मुलं मोठी होत असताना कुटुंबातील बदलत्या नात्यांचा वेध यामध्ये घेण्यात आला आहे.

टीव्हीएफ निर्मित ‘गुल्लक’ या कॉमेडी फॅमिली ड्रामाचा पाचवा सिझन 5 जून 2026 पासून सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहे. या नवीन सिझनमध्ये मिश्रा कुटुंबाच्या नवीन जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी आणि बदलती नाती अधोरेखित करण्यात आली आहेत. या सिझनमध्ये जमिल खान, गीतांजली कुलकर्णी, हर्ष मायार आणि सुनीता राजवर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिझनमधील सर्वांत मोठा बदल म्हणजे मोठा मुलगा अन्नू भैय्याच्या भूमिकेत वैभव राज गुप्ताची जागा आता अनंत व्ही. जोशीने घेतली आहे.

Follow Us