दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकर चर्चेवर शिवसेना शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले भरत गोगावले?
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे, यावर आता शिवसेना शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या शिष्टमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश होता. दरम्यान या नेत्यांनी पक्ष नेतृत्वासंदर्भात अमित शाह यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेत प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेताच आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला उधाण आलं आहे. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे, जर अजित पवार असते, तर 12 फेब्रुवारी रोजीच विलिनीकरण झालं असतं, असं तटकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावर आता शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले गोगावले?
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र यायचं की नाही, हा त्यांचा अंतर्गत निर्णय आहे. शरद पवार, सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ नेत्यांनीच एकत्रीकरणाचा निर्णय घ्यावा. अजितदादा असताना काय घडलं? याबाबत त्यांनाच माहिती, आम्ही यावर भाष्य करणार नाही. राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत आमचं काहीही म्हणणं नाही, वरिष्ठांनीच अंतिम निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया यावर भरत गोगावले यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले होते तटकरे?
सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची कोणतीच चर्चा नाही, परंतु जर अजित पवार असते तर बारा फेब्रुवारी रोजीच विलिनीकरण झालं असतं, असं त्यांनी म्हटलं आहे.
