
Rajpal Yadav: बॉलिवूड कॉमेडियन आणि अभिनेता राजपाल यादव याचं नाव जेव्हा जेव्हा समोर आलं, तेव्हा तेव्हा चाहत्यांच्या समोर फक्त आणि फक्त त्याचे कॉमेडी सीन समोर आले. प्रेक्षकांना खळखळून हसवणारा राजपाल आता तुरुंगात आहे. ज्यामुळे अभिनेत्याच्या चाहत्यांना फार मोठा धक्का बसला आहे. नुकताच अभिनेत्याने तिहार तुरुंगात सरेंडर केलं. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला तब्बव 9 कोटी रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणात शिक्षा सुनावली. त्यानंतर राजपाल याला तुरुंगात जावं लागलं… तुरुंगात असलेल्या राजपाल याला आता बॉलिवूडकडून मोठी मदत मिळत आहे… पण सध्या राजपाल इतर कैद्यांप्रमाणे तुरुंगवास भोगत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपाल यादव याला तुरुंगात कोणतीच व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत नाहिये… जेल नंबर 2 मध्ये सध्या राजपाल राहत आहे. याच ठिकाणी छोटा राजन आणि नीरज बवाना यांसारख्या कुख्यात गुडांना ठेवण्यात आलं होतं. असं देखील सांगितलं जात आहे की, तुरुंगात राजपाल अधिक वेळ शांत बसलेला असतो… अभिनेता सध्या फक्त आणि फक्त कायदेशीर प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे.
तिहार हे आशियातील सर्वात मोठ्या तुरुंगांपैकी एक आहे आणि येथील कैद्यांसाठी बनवलेले नियम खूप कडक आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगात अभिनेता सामान्या कैद्यांप्रमाणे राहत आहे. सकाळी वेळेत उठणं… वेळेत हजेरी लावायची… साफ – सफाई आणि तुरुंगाच्या सर्व नियमांचं पालन अभिनेत्याला करावं लागत आहे… अभिनेत्यासाठी कोणतेच नियम शिथिल करण्यात आलेले नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, रोज सकाळी 6 वाजता त्याला बराकमधून बाहेर काढलं जातं.. आवरुन झाल्यानंतर त्याला चहा आणि नाश्ता दिला जातो… दिवसभर तुरुंगात राहिल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता अभिनेत्याला जेवण दिलं जातं… तुरुंगाने ठरवलेल्या मेनूनुसार खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाते, ज्यामध्ये डाळ, भाजी, पोळी आणि भात यांचा समावेश असतो.
उच्च सुरक्षा वॉर्ड असल्याने, तुरुंगातील इतर कैदी त्याला भेटण्यास उत्सुक आहेत, परंतु कडक सुरक्षेमुळे कोणालाही त्याच्या जवळ येऊ दिले जात नाही. प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता तुरुंगात असल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अशात या प्रकरणातून राजपाल याला कधी दिलासा मिळतो… हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
2010 मध्ये राजपाल यादवने एम. एस. मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून त्याच्या एका सिनेमासाठी पाच कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. ‘अता पता लापता’ या सिनेमाचं दिग्दर्शन राजपाल करत होता. परंतु हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि त्यामुळे त्याला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. व्याज, दंड, विलंबित देयकं यांमुळे थकबाकीची रक्कम जवळपास 9 कोटी रुपयांपर्यंत वाढली. कर्ज चुकवण्यासाठी त्याने कर्जदात्याला अनेक चेक्स दिले होते. परंतु हे चेक्स बाऊन्स झाले. त्यामुळे नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात फौजदारी कारवाई सुरू झाली.