भर चौकात गोळी झाडेन.. उर्फी जावेदला छोटा पंडित बनणं पडलं महागात

उर्फी जावेद आणि चित्रविचित्र फॅशन हे जणू समीकरणच आहे. उर्फीला सर्वसामान्य कपड्यांमध्ये पाहणं दुर्मिळच असतं. कधी साखळ्या तर कधी विविध वस्तूंपासून ती तिचे कपडे डिझाइन करते. त्यातही अंगप्रदर्शनामुळे उर्फी सर्वाधिक चर्चेत असते. नुकतीच ती छोटा पंडितच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

भर चौकात गोळी झाडेन.. उर्फी जावेदला छोटा पंडित बनणं पडलं महागात
Urfi Javed and Rajpal Yadav
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 31, 2023 | 12:14 PM

मुंबई : 31 ऑक्टोबर 2023 | ऑक्टोबर महिन्याचा शेवट आला की सर्वत्र हॅलोवीन पार्टीची क्रेझ पहायला मिळते. चित्रविचित्र लूक आणि कॉस्च्युममध्ये हॅलोवीनची पार्टी केली जाते. हॅलोवीनची थीम असताना अभिनेत्री उर्फी जावेद तरी कशी मागे राहणार? उर्फी नेहमीच तिच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. आता हॅलोवीनच्या निमित्ताने तिने बॉलिवूड चित्रपटातील एका भूमिकेसारखा वेश केला होता. ही भूमिका होती ‘भुलभुलैय्या’ या चित्रपटातील छोटा पंडितची. अभिनेता राजपाल यादवने ही भूमिका साकारली होती. तसाच लूक उर्फीने केला. मात्र तिला छोटा पंडितसारखा लूक करणं महागात पडलं आहे. यामुळे उर्फीला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.

उर्फीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये ती ‘भुलभुलैय्या’मधील राजपाल यादवने साकारलेल्या ‘छोटा पंडित’च्या लूकमध्ये दिसली होती. चेहऱ्यावर भगवा रंग, भगवी धोची आणि कानावर लावलेली अगरबत्ती.. असा हा तिचा लूक आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं होतं, ‘पानी… भुलभुलैय्यामधील छोटा पंडितची भूमिका अनेकांनाच माहीत असेल. हॅलोवीन पार्टीसाठी मी खूप चांगल्या प्रकारे तयार झाली होती. पण पार्टीला जाऊ न शकल्याने मी व्हिडीओ पोस्ट करण्याचा विचार केला.’

या लूकमुळे उर्फीला सोशल मीडियाद्वारे धमकीचे मेसेज येऊ लागले आहेत. याबद्दलची माहिती तिने मुंबई पोलिसांना दिली आहे. एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहित उर्फीने म्हटलंय, ‘मला वेगवेगळ्या लोकांकडून धमकीचे ई-मेल येत आहेत. एकाचं नाव निखिल गोस्वामी आहे. मी माझा व्हिडीओ डिलिट केला नाही तर मला जीवे मारण्यासाठी फार वेळ लागणार नाही, असं त्याने लिहिलंय. दुसरा ई-मेल रुपेश कुमार या नावाने आलं आहे. उर्फी जावेद हिंदू धर्माचा अपमान करतेय. भर चौकात तिच्यावर मी गोळ्या झाडेन, अशी धमकी त्याने दिली आहे.’

‘या देशातील लोकांमुळे मला आश्चर्याचा धक्काच बसतो. एका चित्रपटातील भूमिकेसारखा वेश केल्यानेही मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्या भूमिकेवर मात्र कधी कोणीच आक्षेप घेतला नव्हता’, असं उर्फीने तिच्या ट्विटमध्ये म्हटलंय.