
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री उर्वशी रौतेला भलतं-सलतंच बोलून गेल्याने सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग झाली. एका मुलाखतीत तिला सैफवरील हल्ल्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावर बोलताना तिने अचानक विषय तिच्या महागड्या भेटवस्तूंकडे वळवला. आई-वडिलांनी कशापद्धतीने तिला डायमंडचं रोलेक्स घड्याळ आणि इतर दागिने दिले, हे ती सांगू लागली होती. उर्वशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि त्यावरून नेटकऱ्यांनी तिला सुनावलं. या ट्रोलिंगनंतर तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित सैफची माफी मागितली. मात्र काही वेळानंतर तिने माफीची पोस्टसुद्धा डिलिट केली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशी त्या संपूर्ण प्रकरणाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. मला सैफवरील हल्ल्याबाबत संपूर्ण माहिती नव्हती असं तिने स्पष्ट केलं.
‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत उर्वशी म्हणाली, “मला वाटतं मी थोडं काळजीपूर्वक उत्तर द्यायला पाहिजे होतं. सैफवर हल्ला मध्यरात्रीच्या सुमारास झाला आणि त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मी ती मुलाखत दिली होती. त्यामुळे घटनेच्या गांभीर्याबाबत मला काहीच कल्पना नव्हती. मला इतकंच आठवतंय की सकाळी उठल्यावर मला कोणीतरी सांगितलं की सैफवर हल्ला झाला आहे. ती घटना किती गंभीर होती, हे मला माहीत नव्हतं.”
“माझ्या डाकू महाराज या चित्रपटाच्या यशाबद्दलची ती मुलाखत होती. त्यामुळे त्याबद्दल त्यात बोलणं साहजिक होतं. काहींना वाटलं की मी सैफवर हल्ला करणाऱ्या चोराला ‘डाकू महाराज’ म्हणाले. पण खरंतर ते माझ्या चित्रपटाचं नाव आहे. मी माझ्या आईवडिलांवर खूप प्रेम करते. माझ्यासाठी ते देवासमान आहेत. त्यामुळे त्यांनी मला ज्या भेटवस्तू दिल्या, त्यासाठी मी खूप खुश होते. आपण हिंदीत बोलतो ना की, जोश में होश खो देना (उत्साहाच्या भरात तारतम्य न बाळगणं). माझ्यासोबतही असंच काहीसं घडलं होतं. पण अर्थातच तो माझा शो-ऑफ नव्हता. कारण जर शो ऑफ असता तर मी छोटीशी मिनी वॉच दाखवली नसती”, असं तिने पुढे स्पष्ट केलं.