सगळं वाईटच दाखवतात, कंटाळा कसा येत नाही?, ‘वीण दोघांतली ही तुटेना’च्या कथेवर वैतागले प्रेक्षक

'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेच्या कथानकावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मालिकेत सतत पुरुषांकडून महिलांचा अपमान केला जात असल्याची तक्रार प्रेक्षकांनी केली आहे. या मालिकेत तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

सगळं वाईटच दाखवतात, कंटाळा कसा येत नाही?, वीण दोघांतली ही तुटेनाच्या कथेवर वैतागले प्रेक्षक
Tejashri Pradhan and Subodh Bhave
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 19, 2026 | 7:52 PM

झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरतेय. या मालिकेला प्राइम टाइमवर चांगला टीआरपीसुद्धा मिळतोय. तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेच्या कथानकावर आणि लिखाणावर मात्र काही प्रेक्षक नाराज झाले आहेत. नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. मालिकेत सतत नकारात्मक कथा दाखवल्याची तक्रार प्रेक्षकांनी केली आहे. त्याचप्रमाणे मालिकेत काही संवाद असेही संवाद आहेत, जे सतत महिलांचा अपमान करणारे आहेत, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

स्वानंदी- समर आणि अधिरा-रोहनचा पहिलावहिला सण या मालिकेत साजरा होत आहे. पहिली संक्रांत म्हटलं की उत्साह वेगळाच असतो. पण इथे अधिरा- रोहनच्या नात्यात दुरावा आला आहे. जी अधिरा नेहमी सगळ्या गोष्टी करण्यासाठी उत्साही असायची ती, लग्नानंतरचा पहिला सण साजरा करण्यासाठी मात्र अजिबात उत्साही दिसत नाही. म्हणूनच समर- स्वानंदी ठरवतात की अधिरा – रोहनमधला दुरावा या संक्रांतीला मिटवुया. पण काकूला हे काही पटत नाही. तर दुसरीकडे अंशुमन रोहनचा अपघात करण्याची सुपारी देतो. घरात सगळे कार्यक्रमासाठी रोहनची वाट बघतात, तेव्हा रोहन आला नाही म्हणून काकू तो येणारच नाही यावरून अर्पिता, अधिराला टोमणे मारते. पण तितक्यात स्वानंदी -रोहनला घेऊन येते. नंतर पूजेच्या ठिकाणी रोहनची आई रोहनच्या अपघाताचा विषय घेऊन गोंधळ घालते. यावरूनच समर स्वानंदीवर राग व्यक्त करतो.

“घरातल्या कुठल्याही फंक्शनमध्ये तुमच्या फॅमिलीला सहभागी करून घेतलं की गडबड ही अशी ठरलेलीच असते. एकही सण शांतपणे का नाही साजरा होत? एवढी साधी अपेक्षासुद्धा ठेवणं चूक आहे”, अशा शब्दांत तो स्वानंदीवर ओरडतो. त्यावर “रोहनच्या अपघातामुळे आई घाबरली होती, त्यामुळे त्याला भेटायला धावत आली,” असं स्वानंदी समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. परंतु समर तिच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. “काळजी वाटणं वेगळी गोष्ट आहे, पण अधिराला का दोष द्यायचा? तिचा काय संबंध आहे? रोहनचा अपघात तिच्यामुळे झाला का? उगाच आपलं वड्याचं तेल वांग्यावर. लग्नानंतरचा पहिला सण चांगला व्हावा म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करत होतो ना. म्हणूनच हा घाट घातला ना, आता असं वाटतंय की उगाच केलं हे सगळं,” अशा शब्दांत तो राग व्यक्त करतो.

या प्रोमोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘यांना कंटाळा कसा येत नाही, सगळं वाईटच दाखवतात’, असं एकाने लिहिलंय. तर ‘उद्या थंडी जास्त वाढली की स्वानंदीमुळेच असं म्हणेल हा राजवाडे’ अशी उपरोधिक टीका दुसऱ्याने केली. ‘एवढ्या चांगल्या मालिकेची वाट लावतात, काय फालतू गोष्टींवरून वाद चालू आहे. काय तर म्हणे पांढऱ्या पायाची, अशुभ.. अशा स्क्रिप्टची अपेक्षा नव्हती’, अशा शब्दांत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.