Vikram Gokhale: विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा; डॉक्टरांची महत्त्वपूर्ण माहिती

विक्रम गोखलेंच्या प्रकृतीविषयी मेडीकल बुलेटिन; पुढच्या 48 तासांत निघू शकतं व्हेंटिलेटर

Vikram Gokhale: विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा; डॉक्टरांची महत्त्वपूर्ण माहिती
Vikram Gokhale
Image Credit source: Facebook
| Updated on: Nov 25, 2022 | 12:02 PM

पुणे: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विक्रम गोखलेंच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. ते डोळेही उघडत आहेत, अशी माहिती मेडिकल बुलेटिनद्वारे देण्यात आली. त्यांच्या हातापायांचीही थोडीफार हालचाल होत आहे. पुढच्या 48 तासांत व्हेंटिलेटरवर सपोर्ट काढता येऊ शकतं, असं दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर म्हणाले.

विक्रम गोखले हे 5 नोव्हेंबरपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल आहेत. बुधवारपासून त्यांची तब्येत खालावली होती. “गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. उपचाराला म्हणावा तसा प्रतिसाद त्यांचं शरीर देत नाहीये,” असं गुरुवारी गोखले यांचे फॅमिली फ्रेंड राजेश दामले म्हणाले होते. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा आहे.

कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जोपर्यत डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत कुठलीही अफवा पसरवू नका, अशी विनंतीही दामलेंनी केली होती. विक्रम गोखले यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपट अशा सर्व व्यासपीठांवर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. रंगभूमीवर त्यांनी एक मोठा काळ गाजवला आहे. 2016 मध्ये त्यांनी घशाच्या त्रासामुळे नाटकातून संन्यास घेतला होता.

विक्रम गोखले यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावलं. याच महिन्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या शूटिंगच्या आधीही ते रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळताच त्यांनी शूटिंगला सुरुवात केली होती.