
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांचं नातं अनेकांसाठी यशस्वी आणि आदर्श मानलं जातं. त्यांच्या लग्नाला तब्बल 53 वर्षे पूर्ण होऊनही आजही या दोघांमधील समजूतदारपणा, परस्पर आदर आणि दोघांमधील प्रेम तसंच टिकून आहे. त्यामुळेच अनेक जण अमिताभ बच्चन यांना नेहमीच विचारतात की, पत्नीला आनंदी ठेवण्याचं रहस्य नेमकं काय?
याच प्रश्नाचं उत्तर बिग बी यांनी लोकप्रिय टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’ च्या एका भागात दिलं आहे. एका स्पर्धकाने गंमतीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमिताभ बच्चन यांनी केवळ वैवाहिक आयुष्यच नाही तर संपूर्ण जीवनावर लागू पडेल अशी खोल आणि मोलाची शिकवण दिली.
पती-पत्नीच्या नात्यात हलकी-फुलकी खट्टी-मीठी नोकझोक होणं हे अगदी साहजिक आहे. मात्र, कधी कधी या छोट्या गोष्टी मोठ्या वादात बदलतात आणि घरातील शांतता भंग होते. दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम राहिले तर परिस्थिती अधिकच बिघडू शकते. अशा वेळी अमिताभ बच्चन यांचा अनुभवातून दिलेला सल्ला खूपच उपयोगी ठरू शकतो.
अहंकार सोडणं हीच यशस्वी लग्नाची गुरुकिल्ली
आपल्या 53 वर्षांच्या वैवाहिक अनुभवावरून अमिताभ बच्चन यांनी पत्नीला आनंदी ठेवण्याचा सोपा मार्ग सांगितला आहे. जर एखाद्याला आनंदी आणि टिकाऊ संसार हवा असेल तर थोडी समजूतदारपणा दाखवणं आणि अहंकार बाजूला ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. अनेकदा आपण बरोबर आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात नात्यात दुरावा निर्माण होतो.
बिग बी यांच्या मते, पती-पत्नीच्या नात्यात खरी हार-जीत नसतेच. लग्न झाल्यानंतर दोघंही एक टीम बनून आयुष्यातील आव्हानांना सामोरं जात असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी स्वतःचीच बाजू जिंकावी असा विचार करणं चुकीचं ठरू शकतं. ते म्हणाले की, ‘जर घरात शांतता आणि प्रेम टिकवायचं असेल तर सतत भांडणं आणि वाद घालण्याऐवजी जोडीदाराचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या आणि कधी वेळ आलीच तर मागे हटायलाही शिका.’ कधी कधी पत्नीला जिंकू देणं ही कमजोरी नसून खरी समजूतदारपणा असल्याचं त्यांनी सांगितलं.
अमिताभ आणि जया बच्चन यांच्या नात्यातून एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते. लग्न फक्त मोठ्या क्षणांमुळे टिकत नाही तर रोजच्या आयुष्यातील छोट्या समजूतदारपणामुळे, संयमामुळे आणि एकमेकांना साथ देण्यामुळे ते मजबूत राहतं. हीच आहे यशस्वी आणि आनंदी संसाराची खरी गुरुकिल्ली.