
दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘कांतारा : चाप्टर 1’ अजूनही थिएटरमध्ये दमदार कमाई करतोय. सहसा थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असेल तर त्या चित्रपटाचं ओटीटी प्रदर्शन पुढे ढकललं जातं. परंतु ‘कांतारा : चाप्टर 1’च्या निर्मात्यांनी असं काहीच केलं नाही. प्रदर्शनाच्या ठीक चार आठवड्यांनंतर त्यांनी हा चित्रपट ओटीटीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 31 ऑक्टोबर रोजी ‘कांतारा : चाप्टर 1’ प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. तरी थिएटरमध्ये अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होत आहे आणि परिणामी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईसुद्धा होत आहे. असं असतानाही ओटीटी रिलीजची घाई का, या प्रश्नाचं उत्तर निर्मात्यांनी दिलं आहे.
होम्बाले फिल्म्सचे पार्टनर चलुवे गौडा यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, आधीच केलेल्या करारामुळे ‘कांतारा : चाप्टर 1’ ओटीटीवर नियोजित तारखेलाच स्ट्रीम केला जातोय. परंतु ओटीटीवर सध्या दाक्षिणात्य भाषांमध्येच (तमिळ, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम) हा चित्रपट पाहता येणार आहे. हिंदी व्हर्जनच्या रिलीजसाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याच्या आठ आठवड्यांनंतर हिंदी व्हर्जन ओटीटीवर येणार आहे.
“ओटीटीवरील रिलीजसंदर्भातील करार खरंतर तीन वर्षांपूर्वीच झाला होता. त्यामुळे आम्ही त्या कराराशी बांधिल आहोत. त्यावेळी स्टँडर्ड प्रॅक्टिस वेगळी होती. असंही थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याच्या चार आठवड्यानंतर तो ओटीटीवर आणण्याची पद्धत आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वसामान्य झाली आहे. कोविडच्या आधी आठ आठवड्यांचा अवधी काटेकोरपणे पाळला जायचा. परंतु आता त्यावर काही बंधन नाही”, असं गौडा यांनी स्पष्ट केलं.
कोविडनंतर रजनीकांत यांच्या ‘कुली’सारखा ब्लॉकबस्टर चित्रपटसुद्धा हिंदीसह सर्व भाषांमध्ये चार आठवड्यांनीच ओटीटीवर स्ट्रीम झाला. त्यामुळे ओटीटी रिलीजसंदर्भातील निर्णय हे त्या-त्या चित्रपटानुसार घेतले जातात आणि त्या त्या वेळी जे योग्य वाटतं त्यानुसार घेतात, असंही ते पुढे म्हणाले. जरी ‘कांतारा : चाप्टर 1’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला तरी थिएटरमध्येही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कमाईत फार-फार तर दहा ते पंधरा टक्क्यांचा फरक पडेल, त्याव्यतिरिक्त नुकसान असं काहीच होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.