
फिल्म इंडस्ट्रीमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक जुबीन गार्ग यांचे निधन झाले आहे. वयाच्या 53व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जुबीन यांचे गँगस्टर चित्रपटातील ‘या अली’ हे गाणे तुफान गाजले होते. नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी जुबीन हे सिंगापूरला गेले होते. तेथे स्कूबा डायविंग करताना त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. जुबीन यांच्या निधनाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
जुबीन हे सिंगापूरला नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी गेले होते. त्यापूर्वी ते स्कूबा डायविंगसाठी गेले. स्कूबा डायविंग करत असताना जुबीन हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.
स्कूबा डायव्हिंगदरम्यान झाला अपघात
मीडियाच्या अहवालानुसार, जुबीन यांचा स्कूबा डायव्हिंगदरम्यान अपघात झाला. त्यांना बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी जुबीन यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु केले होते. पण डॉक्टरांना यश आले नाही. अखेर जुबीन यांचा मृत्यू झाला.
जुबीन यांच्या प्रवासाबद्दल बोलायचे झाल्यास, ते एक अप्रतिम गायक असण्यासोबतच अभिनेते आणि लेखकही होते. जुबीन यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९७२ रोजी मेघालयमध्ये झाला होता. असमिया भाषेबरोबरच जुबीन यांनी बंगाली, हिंदी, इंग्रजी, मल्याळम, मराठी, मिसिंग, नेपाळी, ओडिया, संस्कृतसारख्या जवळपास ६० भाषांमध्ये गाणी गायली होती.
बॉलिवूडमध्येही गायली होती अनेक गाणी
कंगना रणौत, इम्रान हाशमी आणि शाइनी आहूजा यांच्या गँगस्टर चित्रपटासाठी त्यांनी प्रसिद्ध गाणे ‘या अली’ गायले होते. जुबीन यांना जवळपास १२ प्रकारचे संगीत वाद्ये वाजवायला येत होती. जुबीन यांचे पूर्ण नाव झुबीन बोरठाकुर गार्ग होते. १९९५ मध्ये जुबीन मुंबईत आले. त्यानंतर त्यांनी पहिला इंडिपॉप अल्बम चांदनी रात लाँच केला. त्यांनी दिल से (१९९८), डोली सजा के रखना (१९९८), फिझा (२०००), कान्टे (२००२) सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी गाणी गायली होती.