Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’मध्ये अवघ्या 1 मिनिटाचा सीन, त्यातही भाव खाऊन गेली ‘ही अभिनेत्री’

'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटात अवघ्या मिनिटभराची भूमिका साकारून ही अभिनेत्री विशेष भाव खाऊन गेली आहे. रणवीर सिंहचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून त्याचे शोज हाऊसफुल आहेत.

Dhurandhar 2: धुरंधर 2मध्ये अवघ्या 1 मिनिटाचा सीन, त्यातही भाव खाऊन गेली ही अभिनेत्री
बॉलिवूड अभिनेत्री
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 19, 2026 | 3:29 PM

Dhurandhar 2: गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक ज्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते, तो ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. ‘धुरंधर 2’च्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत चाहत्यांना बरेच नवीन ट्विस्ट आणि भूमिका पहायला मिळणार आहेत. यात काही सेलिब्रिटींनी पाहुण्या कलाकाराचीही भूमिका साकारली आहे. त्यापैकीच एक भूमिका दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी आणि अभिनेत्री यामी गौतमची आहे. ‘धुरंधर 2’मध्ये यामी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. सोशल मीडियावर यासंदर्भातील बरेच पोस्ट व्हायरल झाले होते. आता या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे.

यामी गौतम या चित्रपटाचा एक भाग असल्याचं वृत्त खरं ठरलं आहे. यामीने आदित्य धरच्या याआधीच्या चित्रपटांमध्येही काम केलं होतं. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’मध्येही तिने भूमिका साकारली होती. आदित्यच्या निर्मिती संस्थेच्या बॅनरअंतर्गत बनलेल्या ‘आर्टिकल 370’मध्येही ती झळकली होती. जेव्हा ‘धुरंधर’ प्रदर्शित झाला, तेव्हासुद्धा यामीने त्या चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

एका मुलाखतीत ती म्हणाली, “मी धुरंधर 2 हा चित्रपट आधीच पाहिला आहे. हा चित्रपट अपेक्षेहून अधिक दमदार असेल आणि तो पाहताना मी भावूक झाली होती. त्यादिवशी मला दुसऱ्या एका ठिकाणी तातडीने जावं लागलं होतं, म्हणून मी आदित्यला त्याबद्दल काही बोलू शकले नव्हते. परंतु तो चित्रपट पाहिल्यानंतर मी काहीच करू शकत नव्हती. मी स्क्रिप्ट वाचू शकत नव्हती, जे बघायचं होतं ते बघू शकत नव्हती. आदित्यसमोर माझ्या भावना मला योग्यरित्या मांडायच्या होत्या, त्यामुळे मी त्याच विचारात मग्न होते. आदित्यने हा चित्रपट बनवण्यासाठी प्रचंड मेहनत केली आहे. या चित्रपटाचा अनुभव प्रेक्षकसुद्धा विसरू शकणार नाहीत.”

आता ‘धुरंधर 2’मध्ये यामी गौतमने शाजिया बानोची भूमिका साकारली आहे. याआधी ‘हक’ या चित्रपटात तिने याच नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. परंतु आता आदित्य धरच्या चित्रपटात ती एक नर्स आहे. या छोट्याशा भूमिकेतूनही तिने विशेष छाप सोडली आहे.

Follow Us