
बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांची गणना त्यांच्या काळातील सर्वांत प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. त्यांनी भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार मंसूर अली खान पटौदी यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर त्यांनी करिअरचा त्याग न करता संसार आणि काम या दोन्ही गोष्टी सांभाळल्या. हे संतुलन राखण्यासाठी त्यांच्याकडे एक खास मंत्र होतं. सुखी संसाराचा हाच मंत्र त्यांनी लेक सोहा अली खानलाही तिच्या लग्नाच्या वेळी दिला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोहाने याचा खुलासा केला.
अभिनेत्री सोहा अली खानने कुणाल खेमूशी लग्न केलंय. या दोघांना एक मुलगी आहे. आईच्या खास मंत्राविषयी सांगताना ती म्हणाली, “एका स्त्रीने पुरुषाच्या अहंकाराची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि पुरुषाने स्त्रियांच्या भावनांची. जर तुम्ही हे करू शकलात, तर तुमचं नातं फार काळापर्यंत मजबूत राहील. आजच्या काळात जरी लोक असं म्हणत असेल की, पुरुषांनाही भावना असतात आणि स्त्रियांनाही अहंकार असतो. परंतु माझ्या आईची शिकवण मला आजही खूप कामी येते. वैवाहिक नातं जपणं हे अनेकदा आव्हानात्मक असतं. त्यासाठी फक्त पार्टनरशिपची नाही तर मैत्रीचीही गरज असते. जर तुम्ही प्रत्येक गोष्ट फक्त जोडीदाराशी शेअर करत असाल, तर त्या नात्यावर गरजेपेक्षा जास्त ताण येऊ शकतो.” आयुष्यात फक्त पतीच सर्वस्व असू नये, तर मैत्रीसारखी इतर नातीही तेवढीच महत्त्वाची असतात, असं मत सोहाने यावेळी मांडलं.
याच मुलाखतीत अभिनेत्री नेहा धुपियासुद्धा उपस्थित होती. लग्नाच्या वेळी सोहानेही तिला खास सल्ला दिल्याचं नेहाने सांगितलं. “सोहाने मला समजावून सांगितलं होतं की पुरुषांचा इगो (अहंकार) खूप नाजूक असतो. त्यामुळे विचारपूर्वक बोललं पाहिजे. एक छोटीशी चूकसुद्धा खूप महागात पडू शकते. मी हळूहळू या गोष्टी शिकले की कोणत्या गोष्टींवर भांडलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टींबाबत गप्प राहाला पाहिजे. पती-पत्नीच्या नात्यात मैत्री टिकवून ठेवणं सर्वांत महत्त्वाचं आहे”, असं ती म्हणाली. नेहा धुपियाने अभिनेता अंगद बेदीशी लग्न केलंय.