
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आले. या दोघांच्या नात्यात फूट पडल्याचीही चर्चा होती. अशातच गेल्या वर्षी युविकाने मुलीला जन्म दिला. प्रिन्स आणि युविकाने त्यांच्या मुलीचं नाव एकलीन असं ठेवलंय. प्रेग्नंसीसंदर्भात युविकाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे आयव्हीएफच्या मदतीने तिने बाळाला जन्म दिला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत युविका याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “बाळाला जन्म देताना मी प्रचंड तणावात होते. आयव्हीएफचा प्रवास भावनिकदृष्ट्या माझ्यासाठी खूपच कठीण होता”, असं ती म्हणाली.
युविका तिच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “जवळपास तीन वर्षे मी आयुष्याच्या त्या टप्प्यात होते. भीती, संभ्रम आणि सतत हातून वेळ निसटण्याची जाणीव होत होती. मला बाळ हवं होतं. माझ्यावर बराच दबाव होता आणि त्या गोष्टींना मी सामोरं गेले. खरंतर त्या दबावाचा मी माझ्यावर परिणाम करून घ्यायला नको होतं. प्रिन्स तर अगदी आरामात होता. मला एका डॉक्टरने सांगितलं की मी आई होऊ शकत नाही. माझ्या एग्जची गुणवत्ता अत्यंत खराब झाली होती. तेव्हा मी 38 वर्षांची होती. डॉक्टरांच्या सांगण्यामुळे मला अधिक नैराश्य आलं. अशा परिस्थितीत योग्य डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं असतं”, असं तिने सांगितलं.
याविषयी युविका पुढे म्हणाली, “जेव्हा मला समजलं की मी आई होऊ शकत नाही, तेव्हा माझा आत्मविश्वास शून्य झाला होता. आम्ही जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांपर्यंत खर्च केला होता. दररोज माझ्या मांडीवर आणि पोटात मला इंजेक्शन्स घ्यावे लागत होते. त्याने मला प्रचंड वेदना व्हायच्या. परंतु मी माझं डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होती. नंतर एकेदिवशी जेव्हा मला बेशुद्ध होण्यासाठी इंजेक्शन दिलं जात होतं, तेव्हा क्लिनिकने सांगितलं की, ही पुन्हा शुद्धीवर आली नाही तर ती आमची जबाबदारी नसेल. तेव्हा आम्ही त्या क्लिनिकला सोडलं. या संपूर्ण प्रक्रियेचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. मानसिकदृष्ट्या बरी झाल्यानंतर आम्ही पुन्हा दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हळूहळू माझा आत्मविश्वास पूर्ववत होऊ लागला.” प्रिन्स आणि युविकाने 12 ऑक्टोबर 2018 रोजी लग्न केलं.