
क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि डान्सर धनश्री वर्मा यांनी 2020 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या पाच वर्षांतच दोघं विभक्त झाले. या दोघांनी घटस्फोटाचा निर्णय का घेतला, याबाबत त्यांनी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. 2025 या वर्षाच्या सुरुवातीलाच दोघं एकमेकांपासून विभक्त झाले. यादरम्यान चहलच्या एका टी-शर्टने नेटकऱ्यांचं विशेष वेधलं होतं. ‘Be Your Own Sugar Daddy’ असा मजकूर त्यावर लिहिला होता. त्यावरून धनश्रीने केवळ पैशांसाठी चहलशी लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यावर धनश्रीनेही सडेतोड उत्तर दिलंय. आता पुन्हा एकदा चहलने त्यावर स्पष्ट केलं की, मी कोणताच ड्रामा केला नाही. मला फक्त एक संदेश द्यायचा होता, तो मी दिला. राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये त्याने सांगितलं की, सुरुवातीला त्याने काहीच बोलण्याचं किंवा दाखवण्याचं ठरवलं नव्हतं. परंतु जेव्हा दुसरीकडून काही गोष्टी झाल्या, तेव्हा मी उत्तर देण्याचा निर्णय घेतला.
याविषयी चहल पुढे म्हणाला, “आता मला कोणाचीच पर्वा नाही. मी कोणासाठी चुकीच्या भाषेचा वापर केला नव्हता. मी फक्त माझं म्हणणं वेगळ्या अंदाजाच मांडलं होतं. जेणेकरून नेमकं काय चाललंय हे लोकांना कळावं. मला कोणाशीही भांडायचं नाहीये. मला फक्त इतकंच सांगायचं होतं की आता सर्वकाही संपलंय आणि पुढे जाण्याची वेळ आली आहे. हा कोणत्याही भांडणाचा किंवा कटाक्षचा इशारा नव्हता, तर फक्त एक मेसेज होता की आता मार्ग वेगळे झाले आहेत.”
मार्च महिन्यात धनश्री आणि चहल अधिकृतरित्या विभक्त झाले. परंतु त्यांनी त्यामागचं कारण सांगितलं नव्हतं. दोघांनी फक्त इतकंच सांगितलं होतं की आता त्यांना आपापल्या आयुष्यात पुढे जायचं आहे. यादरम्यान त्यांच्या घटस्फोटादरम्यान एक मोठा खुलासा झाला आहे. या दोघांमध्ये नेमकं कोणत्या कारणावरून भांडण सुरू झालं होतं, याबाबत जेष्ठ पत्रकार विक्की लालवानी यांचा रिपोर्ट चर्चेत आला आहे. या रिपोर्टमध्ये त्यांनी म्हटलंय की चहल आणि धनश्री यांच्यात कुठे राहायचं यावरून वाद होता. लग्नानंतर दोघं चहलच्या आईवडिलांसोबत हरियाणामध्ये होत होते. परंतु काही वेळानंतर धनश्रीने मुंबईत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. हे चहलला मात्र मंजूर नव्हतं.
याच गोष्टीवरून दोघांमधील मतभेद वाढू लागले होते. विक्की लालवानी यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये लिहिलंय की, चहलला त्याच्या आईवडिलांसोबत राहायचं होतं. कुटुंबाला सोडून वेगळं राहू शकत नाही, अशी त्याची भूमिका होती. तर धनश्रीचं करिअर मुंबईशी संबंधित होतं आणि तिला मुंबईत राहायचं होतं. परंतु या रिपोर्टवर अद्याप चहल, धनश्री किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.