
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. या दोघांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता घटस्फोटाच्या काही वर्षांनंतर हे दोघं आपापल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेले आहेत. एकीकडे हृतिक अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय तर सुझान ही अर्सलान गोणीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तरीसुद्धा हृतिक आणि सुझान यांच्यात अजूनही चांगली मैत्री कायम आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुझानचा भाऊ आणि अभिनेता झायेद खान त्याच्या बहिणीच्या घटस्फोटाबाबत मोकळेपणे व्यक्त झाला.
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत झायेद म्हणाला, “आमचं कुटुंब अत्यंत रुढीवादी असून गोष्टी कशा असू शकतात याबद्दल आमचा दृष्टीकोन अत्यंत मॉडर्न आहे. प्रत्येक गोष्ट काळी किंवा पांढरीच असावी असं काही नसतं. सर्वांत महत्त्वाची गोष्ट काय? तर तुम्हाला त्या व्यक्तीला आनंदी, खुश बघायचं असतं. जर तुम्ही खुशच नसाल तर या सगळ्या गोष्टींचा काहीच अर्थ नाही. एखाद्या निर्णयावर आमच्या पालकांनी नेहमीच एक गोष्ट केली आहे. ते म्हणजे ते आमच्या डोळ्यांत पाहून विचारतात की, तुला हे हवंय का? तुला सर्व गोष्टींची कल्पना आहे, तरी तुला हे हवंय का? जर तुम्ही त्यांच्या डोळ्यांत पाहून ठामपणे सांगितलं की, होय.. मला हेच हवंय. तर मग ठरलं. ते तुमच्यासोबत कायम राहणार. आमचा आनंद त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे.”
बहीण सुझानबद्दल तो पुढे म्हणाला, “जर तुम्ही बाकीच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या तर तुमच्या जोडीदारासोबत असलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट कोणती असेल? तर विश्वास. समजूतदारपणा आणि काही प्रमाणात सुसंगतता. या गोष्टींना तुम्ही जर इतर गोष्टींपेक्षा अधिक महत्त्व दिलं नाही तर नक्कीच त्या नात्यात काहीतरी चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही प्रसिद्धीसाठी लग्न करता का? तुम्ही पैशांसाठी लग्न करता का? जर तुम्ही या गोष्टींसाठी लग्न करत असाल तर तुमच्या आयुष्यात असंख्य समस्या असतील. विशेषकरून घटस्फोटाच्या वेळी या समस्या उफाळून वर येतील. मला इतरांबद्दल माहीत नाही, पण अशी परिस्थिती समजून घेण्यासाठी आम्ही खूप समजूतदार आहोत. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, इतर लोक काय विचार करतात याने मला फरक पडत नाही. आमच्या कुटुंबात प्रत्येकजण आनंदी असेल तर आम्ही आनंदी आहोत.”
सुझानच्या आताच्या पार्टनरविषयी विचारलं असता झायेदने सांगितलं, “तो खूप कूल आहे. त्याचं मन खूप चांगलं आहे. तो अत्यंत सकारात्मक आणि उत्साही असतो. नेहमी हसत आणि खुश असतो. त्याला मजेदार गोष्टी करायला आवडतात. अर्थात तो वयाने माझ्यापेक्षा लहान आहे. पण ठीक आहे. “