Zubeen Garg : झुबीन गर्गच्या मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप; चौकशीसाठी SIT, मुख्यमंत्री म्हणाले “कोणालाही सोडणार नाही”

Zubeen Garg : झुबीन गर्गच्या मृत्यूचं गूढ अद्याप कायम आहे. याप्रकरणी आता 10 सदस्यांची एसआयटी स्थापित करण्यात आली आहे. बुधवारी यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की, आम्ही कोणालाही सोडणार नाही.

Zubeen Garg : झुबीन गर्गच्या मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप; चौकशीसाठी SIT, मुख्यमंत्री म्हणाले कोणालाही सोडणार नाही
Zubeen Garg
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 25, 2025 | 8:53 AM

Zubeen Garg : प्रसिद्ध गायक झुबीन गर्गच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आसाम पोलिसांनी 10 सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन केलं आहे. बुधवारी आसामचे पोलीस महासंचालक हरमीत सिंग, सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक एमपी गुप्ता आणि मुख्य सचिव रवी कोटा यांच्यासोबत एक बैठक झाली. बैठकीनंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आश्वासन दिलं की, “आम्ही कोणालाही सोडणार नाही.” सीआयडीचे विशेष महासंचालक एमपी गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीमध्ये सर्वोत्तम पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे त्यांना अत्यंत सचोटीने या प्रकरणाची चौकशी करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असेल, असंही त्यांनी सांगितलं. आसामचा प्रसिद्ध गायक झुबीन गर्गचं सिंगापूरमध्ये स्कूबा डाइव्हिंगदरम्यान पाण्यात बुडून मृत्यू झाला. 19 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. त्यानंतर सिंगापूरच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं होतं.

मंगळवारी 23 सप्टेंबर रोजी झुबीनच्या पार्थिवावर गुवाहाटीतील एका गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्यात आलं. यादरम्यान गोळा केलेला व्हिसेरा नवी दिल्लीतील सेंट्रल फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. झुबीनचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा अहवाल सिंगापूरच्या रुग्णालयाने दिला होता. परंतु त्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. याप्रकरणी चार जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये 55 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे आयोजक श्यामकानू महंत, झुबीनच्या टॅलेंट मॅनेजमेंट ग्रुपचे सिद्धार्थ शर्मा, झुबीनच्या बँडमधील ड्रमर शेखरज्योती गोस्वामी आणि व्यापारी संजीव नारायण यांचा समावेश आहे. हे सर्व एफआयआर सीआयडीकडे नोंदवलेल्या गुन्ह्यात एकत्रित करण्यात आले आहेत.

आसाम राज्य सरकारने श्यामकानू महंत आणि त्यांच्याशी संबंधित कोणत्याही संस्थेला राज्यात कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापासून ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवरील पोस्टद्वारे दिली. त्याचप्रमाणे राज्य सरकार त्यांच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित असलेल्या कोणत्याही कार्यक्रमाला आर्थिक अनुदान, जाहिरात किंवा प्रायोजकत्व देणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान आसाममधील विरोधी पक्षांनी झुबीनच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सिंगापूरमधील नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हल दबावाखाली आयोजित करण्यात आल्याचाही आरोप विरोधकांनी केला आहे. तर आसाम विधानसभेतील विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं आहे.