
Zubeen Garg : ‘या अली’, ‘जाने क्या चाहे मन’ यांसारख्या ब्लॉकबस्टर गाण्यांचा गायक झुबीन गर्गचं वयाच्या 52 व्या वर्षी सिंगापूरमध्ये स्कूबा डाइव्हिंग करताना निधन झालं. 19 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी तो सिंगापूरला गेला होता. तिथे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. झुबीनच्या निधनानंतर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रोफेशनल स्विमरसुद्धा पाण्यात बुडू शकतात का, एखाद्याला पोहता येत असलं तरी तो स्विमिंग पूल, समुद्र किंवा नदीच्या पाण्यात बुडू शकतो का, असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत. याविषयी दौलत राम कॉलेजमधील प्रोफेशनल स्विमर आणि राष्ट्रीय खेळाडू आझाद वीर सिंग भडाना यांनी ‘न्यूज 18’शी बोलताना काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
“आग आणि पाणी या दोन गोष्टींशी कधीही खेळू नये. या दोन्ही गोष्टींच्या बाबतीत एखादी क्षुल्लक निष्काळजीपणासुद्धा महागात पडू शकतो. एखादा स्विमर पोहण्यात कितीही कुशल असला तरी एक छोटीशी चूक त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. जेव्हा तुम्हाला पाण्यात व्यवस्थित पोहायला येतं, मग तुम्ही प्रोफेशनल स्विमर असो किंवा नसो.. तुमच्यातील भीती नाहीशी होते. मग ती व्यक्ती अतिआत्मविश्वासात येऊ लागते आणि मग काहीजण लाइफ जॅकेट न घालताच पाण्यात उतरण्याची चूक करतात. अशातच जेव्हा त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागतं, तेव्हा ते घाबरतात. याच भीतीमुळे ते वेगाने पाण्यात हातपाय मारायला सुरुवात करतात. यातच त्यांची संपूर्ण ऊर्जा संपते. यामुळे ते बेशुद्ध होतात आणि पाण्यात बुडतात”, असं त्यांनी सांगितलं.
याविषयी ते पुढे म्हणाले, “तुम्हाला व्यवस्थित पोहता येत असो किंवा नसो.. स्विमिंग पूल, वॉटर पार्क, समुद्र, तलाव किंवा नदीत उतरताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावीच लागते. सर्वांत आधी लाइफ जॅकेट घालणं खूप महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे पोहताना सोबत एखादा प्रशिक्षक असावा. प्रशिक्षकाच्या उपस्थितीत तुम्ही पोहायला जा. पाण्यात पोहताना नाक बंद ठेवा आणि तोंडाने श्वास घ्या. कान आणि डोळ्यांना पाण्यापासून वाचवण्यासाठी सेफ्टी किटचा वापर करा. याने तुमच्या शरीरात पाणी जाणार नाही आणि परिणामी तुम्ही घाबरणार नाही.”
कुठेही पोहताना आपण बुडतोय अशी भीती वाटू लागली तर काय करावं याविषयी त्यांनी काही टिप्स दिल्या आहेत. “सर्वांत आधी तुम्ही तुमचा श्वास रोखा. श्वास रोखून धरल्यावर तुमचं शरीर आपोआप पाण्यात तरंगू लागेल. त्यानंतर तोंड पाण्याबाहेर काढा. पाण्याचा प्रवाह ज्या दिशेने असेल, त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करा आणि हळूहळू स्वत:ला किनाऱ्यावर आणा. पाण्याच्या प्रवाहाशी लढण्याचा प्रयत्न केला, तर तुमची ऊर्जा तिथेच संपून जाईल आणि सर्व प्रयत्न फोल ठरतील”, असं त्यांनी स्पष्ट केलं.