
Zubeen Garg : ‘या अली’ या ब्लॉकबस्टर हिट गाण्याचा गायक झुबीन गर्गचं 19 सप्टेंबर रोजी निधन झालं. आसामी गायक झुबीनच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सिंगापूरमध्ये स्कूबा डाइव्हिंगदरम्यान त्याने आपले प्राण गमावले. चौथ्या नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी तो सिंगापूरला गेला होता. 20 सप्टेंबर रोजी त्याचा परफॉर्मन्स होता. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की झुबीनने डाइव्हिंगला जाताना लाइफ जॅकेट घातलं नव्हतं. याच कारणामुळे त्याचं निधन झालं. परंतु झुबीनची पत्नी गरिमा सैकियाने स्कूबा डाइव्हिंगदरम्यान झालेल्या दुर्घटनेचं कारण नाकारलं आहे. गरिमाने झुबीनच्या मृत्यूचं खरं कारण सांगितलं आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना झुबीनची पत्नी गरिमाने सांगितलं की तो इतर सात-आठ लोकांसोबत एकाच जहाजाने सिंगापूरच्या एका बेटावर गेले होते. यावेळी त्याच्यासोबत ड्रमर शेखर आणि सिद्धार्थसुद्धा उपस्थित होते. ग्रुपमधल्या सर्व सदस्यांनी लाइफ जॅकेट्स घातले होते. परंतु जेव्हा झुबीन पुन्हा पोहायला गेला, तेव्हा त्याला झटका आला. गरिमा म्हणाली, “ते सर्वजण एकत्र पोहत होते. त्यानंतर ते याचवरून किनाऱ्यावर आले होते. त्या सर्वांनी लाइफ जॅकेट घातलं होतं. परंतु झुबीन पुन्हा पोहायला गेला आणि त्याचवेळी त्याला झटका आला.”
गरिमाने असंही सांगितलं की झुबीनला झटका येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याच्याआधीही त्याला असा अनुभव आला होता, परंतु नंतर तो बरा झाला होता. झुबीनला सिंगापूर जनरल हॉस्पीटलमधल्या आयसीयूमध्ये दोन तासांपर्यंत ठेवण्यात आलं होतं. झुबीन हा आसाममधील सर्वांत लोकप्रिय आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या गायकांपैकी एक होता. त्याने आसामी, बंगाली, हिंदी आणि नेपाळी भाषांमध्ये 40 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत.
झुबीनच्या निधनाच्या वृत्ताने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. शनिवारी रात्रीपासूनच झुबीनचे चाहते गुवाहाटी विमानतळाबाहेर जमू लागले होते. मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा त्याचं पार्थिव दिल्लीहून एका विशेष विमानाने गुवाहाटीसला आणलं जाईल, अशी बातमी पसरली, तेव्हा जमावाने दोन बॅरिकेड्स तोडले आणि विमानतळाच्या टर्मिनलकडे धावण्यास सुरुवात केली. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना जमावावर लाठीचार्ज करावा लागला. काही लोकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या आणि पोलीस वाहनांचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला.