माधुरी हत्ती पुन्हा कोल्हापुरात; वनतारा करणार दर पंधरा दिवसांनी वैद्यकीय तपासणी
कोल्हापुरात ‘महादेवी’ म्हणून ओळखली जाणारी माधुरी हत्ती आता पुन्हा कोल्हापुरात परतणार आहे. उच्चाधिकार समितीने (HPC) 9 सप्टेंबर रोजी माधुरीला कोल्हापुरात परतण्यास परवानगी दिली आहे. मात्र, तिच्या देखभालीसाठी समितीने काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. माधुरीला 30 जुलै 2025 रोजी उच्चाधिकार समितीच्या निर्देशानुसार जामनगर येथील वनतारा येथे नेण्यात आले होते. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च […]

कोल्हापुरात ‘महादेवी’ म्हणून ओळखली जाणारी माधुरी हत्ती आता पुन्हा कोल्हापुरात परतणार आहे. उच्चाधिकार समितीने (HPC) 9 सप्टेंबर रोजी माधुरीला कोल्हापुरात परतण्यास परवानगी दिली आहे. मात्र, तिच्या देखभालीसाठी समितीने काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत.
माधुरीला 30 जुलै 2025 रोजी उच्चाधिकार समितीच्या निर्देशानुसार जामनगर येथील वनतारा येथे नेण्यात आले होते. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचीही मान्यता होती. माधुरीचा ताबा मिळावा अशी मागणी वनताराने केली नव्हती, तर न्यायालयीन निर्देशानुसार तिची जबाबदारी स्वीकारून तिच्यावर उपचार आणि देखभाल करण्यात आली, असे वनताराने स्पष्ट केले. माधुरीच्या कोल्हापुरातील भावनिक महत्त्वाची वनताराला पूर्ण जाणीव असल्याचे निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र सरकार, अधिकारी, स्थानिक हितधारक आणि नागरिकांशी झालेल्या चर्चेनंतर 6 ऑगस्ट 2025 रोजी वनताराने सक्षम प्राधिकरणांच्या निर्णयाचा आदर करून त्याचे पालन करण्याची भूमिका स्पष्ट केली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर माधुरीबाबतचे दावे उच्चाधिकार समितीसमोर मांडण्यात आले. समितीने संबंधित पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच विविध अहवाल मागवून नांदणी येथील सुविधेची पाहणी केली. त्यानंतर 9 सप्टेंबर रोजी समितीने माधुरीला काही अटींसह कोल्हापुरात परतण्याची परवानगी दिली. माधुरीचा मिरवणुका किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी वापर करता येणार नाही. तिला चोवीस तास योग्य देखभाल मिळणे आवश्यक आहे. तसेच तिची दर पंधरा दिवसांनी वैद्यकीय तपासणी करावी लागणार आहे.
वनताराच्या म्हणण्यानुसार, सातत्यपूर्ण पशुवैद्यकीय उपचारांमुळे माधुरीची प्रकृती स्थिर झाली आहे. मात्र, तिच्या दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या पूर्णपणे दूर झालेल्या नाहीत. त्यामुळे तिला नियमित उपचार, आवश्यक वैद्यकीय मदत आणि पशुवैद्यकीय देखरेखीची गरज कायम राहणार आहे. माधुरी कोल्हापुरात परतल्यानंतरही वनतारा तिच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक मदत सुरू ठेवणार आहे. तिच्यासाठी योग्य निवास व्यवस्था, पशुवैद्यकीय सुविधा, वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी वनताराने मदत केली आहे.
विशेष म्हणजे, वनताराचे पशुवैद्यकीय डॉक्टर दर पंधरा दिवसांनी कोल्हापुरात जाऊन माधुरीची तपासणी करणार आहेत. या तपासणीचे अहवाल सक्षम प्राधिकरणांना सादर केले जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि उच्चाधिकार समितीच्या निर्देशांबद्दल वनताराने आभार व्यक्त केले आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात सरकार तसेच त्यांच्या अधिकाऱ्यांचेही आभार मानण्यात आले आहेत. माधुरीबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या कोल्हापुरातील मठ आणि नागरिकांचेही वनताराने आभार मानले.
माधुरीची प्रकृती उच्चाधिकार समितीसमोर मांडण्यात भूमिकेबद्दल पेटा इंडियाचेही वनताराने आभार मानले आहेत. माधुरीचे आरोग्य, कल्याण आणि सन्मान हेच वनताराचे प्रमुख उद्दिष्ट असून, ती कुठेही राहिली तरी तिच्या आरोग्याची आणि कल्याणाची काळजी घेण्याची बांधिलकी कायम राहील, असे वनताराने स्पष्ट केले आहे.
