Mumbai: लालबागच्या राजाच्या स्वागत गेटवर तिरूपती बालाजीचा देखावा, स्वागत गेटवरील हत्तीने वेधलं सर्वांच लक्ष

मुंबईतील लालबागच्या राजाने यंदाही सर्वांचे लक्ष वेधले आहे. लालबाग राजाच्या स्वागत गेटवर यंदा तिरूपती बालाजीचा देखावा साकारण्यात आला आहे.

Mumbai: लालबागच्या राजाच्या स्वागत गेटवर तिरूपती बालाजीचा देखावा, स्वागत गेटवरील हत्तीने वेधलं सर्वांच लक्ष
Lanbaug Raja
| Updated on: Aug 23, 2025 | 9:41 PM

राज्यभरात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. गणेश भक्तांची सजावटीसाठी धावपळ सुरु आहे. मुंबईतील लालबागच्या राजाने यंदाही सर्वांचे लक्ष वेधले आहे. लालबाग राजाच्या स्वागत गेटवर यंदा तिरूपती बालाजीचा देखावा साकारण्यात आला आहे. तसेच स्वागत गेटवरील मोठा हत्ती आकर्षणाचं केंद्र ठरला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

यंदा लालबाग येथे जामनगरच्या वनताराची थीम साकारण्यात आली आहे. त्यासोबत दक्षिण भारतातील प्रख्यात तिरुपती बालाजीच्या मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. लालबागचा राजा हा मुंबईतील सर्वात जास्त गर्दी होणारा गणपती आहे. 11 दिवसांत येथे येणाऱ्या भक्तांची संख्या कोट्यवधींमध्ये पोहोचते.

यावर्षी मंडळात 50 फूट उंच एसी मंडपात लालबागच्या राजाची स्थापना होणार आहे. या मंडपासाठी मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी प्रायोजकत्व दिले आहे. गणेश मुहूर्त पूजन 14 जून रोजी झालं होतं आणि त्यानंतर मंडपाचे बांधकाम सुरू झाले होते. हे गणेश मंडळ सप्टेंबर 1934 मध्ये कोळी समाज, गिरणी कामगार आणि लालबाग बाजारातील व्यापाऱ्यांनी सुरू केला होता. तेव्हा पासून ही परंपरा पुढे सुरूच आहे

लालबागचा राजा याला ‘नवसाचा राजा’ असेही म्हटले जाते. संततीसाठी मनोमन इच्छा करणाऱ्या जोडप्यांचे नवस इथे पूर्ण होतात अशी भावना आहे. त्याचबरोबर घर प्राप्तीची इच्छा असणऱ्यांचेही नवस इथे पूर्ण होतात असं मानलं जातं. त्यामुळे लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांची मोठी गर्दी पहायला मिळते.

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्ती-करीता जनजागृती व्हावी याकरीता सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तोच उद्देश त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी नजरेसमोर ठेवून धार्मिक कार्याबरोबरच समाज जागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य हाती घेतले. 1334 ते 1947 या स्वातंत्र्यपूर्व काळात विविध नेत्यांची व्याख्याने आयोजित केली जात असत.

अखिल भारतीय पुढारी शंकरराव देव, कामगार नेते भाई डांगे, एस.एम. मिरजकर, भाई जगताप, हिंदुत्वनिष्ठ अनंतराव गद्रे, मुंबई काँग्रेसचे पुढारी एस.के. पाटील, गो.बा. महाशब्दे, भुलाभाई देसाई अशी राष्ट्रीय विचारसरणीची मंडळी येथे व्याख्याने देऊन जनजागृती करीत असत.