झोपेत तोंडातून लाळ का गळते? 99 टक्के लोकांना माहिती नाही कारण

झोपेत तोंडातून लाळ का गळते? ही सामान्य सवय आहे की एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण? आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलेली कारणे, त्यामागील आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या.

झोपेत तोंडातून लाळ का गळते? 99 टक्के लोकांना माहिती नाही कारण
Drool in Sleep
| Updated on: Jun 12, 2026 | 2:16 PM

सकाळी उठल्यावर उशीवर लाळेचे सुकलेले डाग दिसणे ही अनेकांसाठी अत्यंत सामान्य गोष्ट असते. अनेकदा आपण याकडे एक क्षुल्लक सवय म्हणून दुर्लक्ष करतो. कधी कधी तर त्याची थट्टा उडवून सोडून देतो. परंतु, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्यासोबत असं रोज घडत असेल, तर सावध होण्याची गरज आहे. ही केवळ एक साधी सवय नसून, तुमच्या शरीरात दडलेल्या एखाद्या मोठ्या आजाराचा पूर्वसंकेत असू शकतो. याच पार्श्वभूमीवर आपण लाळ का गळते आणि कधी डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे, याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया.

 शरीरासाठी लाळ का महत्त्वाची आहे?

वैद्यकीय तज्ज्ञांनुसार, आपल्या तोंडात असणाऱ्या ग्रंथींमधून दररोज साधारण ०.५ ते १.५ लिटर लाळ तयार होते. अन्न पचनास मदत करणे, तोंड ओलसर ठेवणे, दातांचे रक्षण करणे आणि तोंडात येणाऱ्या हानिकारक जीवाणूंना (Bacteria) नष्ट करणे ही लाळेची मुख्य कामे आहेत. दिवसभरात आपण ही लाळ नकळत सतत गिळत असतो. त्यामुळे आपल्याला त्याचा अंदाज येत नाही.

मग रात्री झोपेतच लाळ का बाहेर पडते?

तज्ज्ञ सांगतात की, जेव्हा आपण गाढ झोपेत असतो, तेव्हा आपल्या शरीराचे स्नायू पूर्णपणे सैल पडतात. अशा वेळी लाळ गिळण्याची आपली नैसर्गिक प्रक्रिया मंदावते. लाळ गळण्याची मुख्य कारणे काय?

१. कुशीवर किंवा पोटावर झोपणे: जर तुम्ही पाठीवर न झोपता डाव्या-उजव्या कुशीवर किंवा पोटावर पालथे झोपत असाल, तर गुरुत्वाकर्षणामुळे तोंडात जमा झालेली लाळ सहजपणे उशीवर वाहू लागते.
२. नाक बंद असणे (तोंडातून श्वास घेणे): जर तुम्हाला सर्दी, ॲलर्जी किंवा सायनसचा त्रास असेल आणि नाक बंद झाले असेल, तर रात्री झोपेत नकळत तोंड उघडे राहते. तोंडातून श्वास घेताना लाळ बाहेर गळू लागते.
३. ॲसिडिटी किंवा पित्ताचा त्रास: ज्या लोकांना रात्री छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे किंवा गॅसचा त्रास होतो, त्यांच्या शरीरात नेहमीपेक्षा जास्त लाळ तयार होते. ही लाळ रात्री झोपेत बाहेर पडते.

या गंभीर आजारांचे संकेत असू शकतात?

लाळ गळणे कधीतरी ठीक आहे, पण जर हा त्रास रोजचाच असेल, तर ते आजारांचे लक्षण असू शकते. स्लीप ॲप्निया हा झोपेशी संबंधित एक गंभीर आजार आहे. यात झोपेत काही सेकंदांसाठी माणसाचा श्वास रोखला जातो. अशा वेळी माणूस घाबरून तोंडातून मोठा श्वास घेतो आणि त्यामुळे लाळ गळते. घसा दुखत असेल, टॉन्सिल्स वाढले असतील तर लाळ गिळताना त्रास होतो, ज्यामुळे लाळ तोंडात साठून बाहेर पडते. काही वेळा मेंदूकडून लाळ नियंत्रणाचे संदेश नीट न मिळाल्यास किंवा नसांच्या आजारामुळे लाळेवर ताबा राहत नाही.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us