
आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा रात्री उशिरा जेवतो आणि लगेच झोपतो. कधी कामामुळे, कधी मोबाइल किंवा टीव्ही पाहता पाहता वेळेची जाणीवच होत नाही. तुम्हाला माहिती आहे का की रात्री जेवणाची योग्य वेळ तुमच्या झोपेवर, पचनावर आणि एकूण आरोग्यावर किती परिणाम करते. आयुर्वेद असो की डॉक्टर, दोघेही यावर जोर देतात की जेवण आणि झोप यांच्यात पुरेसे वेळेचे अंतर असणे अत्यंत आवश्यक आहे.
योग्य वेळी जेवल्याने जेवण चांगले पचते. तसेच झोपही गाढ आणि शांत लागते. चला तर मग जाणून घेऊया की झोपण्यापूर्वी किती वेळ आधी जेवण करावे. याबाबत आयुर्वेद आणि डॉक्टर काय सांगतात.
झोपण्यापूर्वी किती वेळ आधी जेवण करावे
आयुर्वेद आणि डॉक्टरांच्या मते, चांगल्या पचनक्रियेसाठी आणि उत्तम झोपेसाठी रात्रीचे जेवण कमीत कमी २ ते ३ तास आधी करावे. इतका वेळ दिल्याने जेवणाला चांगले पचण्याची संधी मिळते आणि ऍसिडिटी, गॅस किंवा छातीत जळजळ यांसारख्या समस्यांचा धोका कमी होतो. ज्यांना GERD किंवा वारंवार अॅसिड रिफ्लक्सची समस्या असते, त्यांच्यासाठी हे अंतर ३ तास किंवा त्याहून जास्त ठेवणे आणखी फायदेशीर मानले जाते. उदाहरणार्थ, जर तुम्ही रात्री १० वाजता झोपता तर ७ ते ८ वाजेपर्यंत जेवण उरकावे आणि जर ११ वाजता झोपता तर ८ वाजेपर्यंत जेवण करणे चांगले, जेणेकरून झोपताना पोट हलके राहील आणि झोप गाढ येईल.
जेवण आणि झोप यांच्यात अंतर का आवश्यक आहे?
१. जेवण योग्य पचते – जेवणानंतर शरीराला ते पचवण्यासाठी वेळ लागतो. लगेच आडवे झाल्यास पचनक्रिया नीट होत नाही.
२. अॅसिडिटी आणि छातीत जळजळ टाळता येते – जेवणानंतर लगेच आडवे झाल्याने पोटातील अॅसिड वर येऊ शकते, ज्यामुळे अॅसिड रिफ्लक्स, छातीत जळजळ, आंबट ढेकर यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
३. चांगली आणि गाढ झोप मिळते – झोपेदरम्यान शरीर स्वतःची दुरुस्ती करतो, मेंदूला विश्रांती मिळते आणि हार्मोन्सचे संतुलन राखले जाते. पोट जड असेल किंवा पचन सुरू असेल तर झोप वारंवार तुटते.
४. वजन आणि मेटाबॉलिझमसाठी – रात्री उशिरा जेवल्याने मेटाबॉलिझम मंदावतो, चरबी साठू लागते आणि वजन वाढण्याचा धोका वाढतो.
रात्री काय जेवावे आणि काय टाळावे?
रात्री हलके आणि सहज पचणारे जेवण जसे उकडलेल्या किंवा हलक्या शिजवलेल्या भाज्या, डाळ, खिचडी, थोडी रोटी किंवा भात, हलके गरम दूध (हळदीसोबत), थोडेसे बदाम किंवा अक्रोड आणि दही (कमी प्रमाणात) खाऊ शकता. तर रात्री अतिजड जेवण, तळलेले-भाजलेले आणि जास्त मसालेदार पदार्थ, जास्त गोड पदार्थ किंवा स्नॅक्स, कॅफीन (चहा, कॉफी), उशिरा फळे (विशेषतः खूप गोड किंवा जड फळे) खाणे टाळावे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच डॉक्टरांच्या सल्लाने उपाय करावेत)