
नवी दिल्ली : नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी (unwanted pregnancy) अनेक महिला गर्भनिरोधक गोळ्यांचा (Contraceptive Pill) अवलंब करतात. गर्भनिरोधक गोळी निःसंशयपणे गर्भधारणा रोखते परंतु ती आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक (harmful for body) असते. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या बिलकूल घेऊ नयेत. गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने एका महिलेच्या जीवास धोका पोहोचल्याची अतिशय धक्कादायक घटना ब्रिटनमध्ये घडल्याचे समोर आले आहे. ज्याबद्दल वाचल्यानंतर तुमचाही विश्वास बसणार नाही. येथे एका 25 वर्षीय महिलेला गर्भनिरोधक गोळीमुळे जीव गमवावा लागला असता. ओरल (तोंडातून) कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल (oral) घेतल्यानंतर हॉली मॅककोमिश नावाच्या महिलेला जीवघेणा स्ट्रोक आला.
एका रिपोर्टनुसार, अवघ्या 25 वर्षांच्या असलेल्या हॉलीने Microgynon 30 नावाची गर्भनिरोधक गोळी घेतली होती. व्यवसायाने थिएटर प्रोड्युसर असलेल्या हॉलीने सांगितले की ती काही महिन्यांपासून या गोळ्या घेत होती. पण एके दिवशी तिला अचानक त्रास सुरू झाला आणि जणू ती आपल्याच शरीरात अडकली आहे. आता आपण मरणार आहोत असे तिला वाटायला लागले होते.
दृष्टी झाली धूसर
हॉलीने सांगितले की ती तंदुरुस्त आणि निरोगी दिसत होती परंतु ऑक्टोबर 2021 मध्ये एका मीटिंगदरम्यान ती अचानक कोसळली. तिची दृष्टी धूसर झाली आणि तिला अस्पष्ट दिसू लागले. तसेच काहीही बोलताही येत नव्हते. पण तितक्यात कोणाला तरी तिची परिस्थिती लक्षात घेतली आणि लगेच डॉक्टरांना फोन करण्यात आला, रुग्णवाहिका बोलावण्यात आली.
हॉलीने दिलेल्या माहितीनुसार, ,या घटनेच्या दोन महिने आधी डॉक्टरांनी तिला फोनवरच गर्भनिरोधक गोळीचे प्रिस्क्रिप्शन दिले व ती गोळी घेण्यास सांगितले. मात्र डॉक्टरांनी ती गोळी प्रिस्क्राईब करण्यापूर्वी कोणतेही प्रश्न विचारले नाही, त्या गोळीच्या कोणत्याही दुष्परिणांमाविषयी कल्पनाही दिली नाही.
महिलेला जाणवला होता डिप्रेशनचा त्रास
या गर्भनिरोधक गोळ्या घ्यायला लागल्यानंतर हॉली हिला डिप्रेशन अर्थात नैराश्याची लक्षणे जाणवू लागली होती. पण नंतर हळूहळू हॉलीला डोकेदुखीचा त्रास होऊ लागला, तसेच वारंवार सुस्तीही येऊ लागली. या सर्व सामान्य गोष्टी आहेतला वाटले होते. पण काही महिन्यांनी तिला मिनी स्ट्रोक आला. जेव्हा आपल्या मेंदूला तात्पुरते रक्त पोहोचण्यात अडचण येते, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ लागतात, तेव्हा मिनी स्ट्रोक येतो.
या घटनेनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता. डॉक्टरांनी तिला लगेच गर्भनिरोधक गोळी घेणे बंद करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर हॉलीला रक्त पातळ करण्यासाठी औषध देण्यात आले. हृदयाला छिद्र पडल्याने रक्ताच्या गुठळ्या मेंदूपर्यंत गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर हॉलीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आता ती पूर्णपणे बरी आहे.
गर्भनिरोधक गोळी म्हणजे काय ?
या गोळ्या इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन यांचे मिश्रण करून तयार केले जातात. हे संप्रेरक अथवा हार्मोन हे मेंदूला ल्युटेनिझिंग हार्मोन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन सोडण्यापासून प्रतिबंधित करतात, जे गर्भधारणा रोखतात.