शरीरातील ‘हे’ प्रोटीन कॅन्सरचा धोका रोखण्यात महत्त्वाचे! त्याला हेल्दी कसं ठेवावं?
Cancer Prevention : शरीरातील एक खास प्रोटीन पेशींमधील डीएनएचं नुकसान ओळखून कॅन्सरचा धोका कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतं. हे प्रोटीन ट्यूमर तयार होण्याचा धोका कमी करण्यास मदत करते. त्याचं कार्य योग्य राहण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, जाणून घेऊया.

आपल्या शरीरात एक असे प्रोटीन असते, जे पेशींमध्ये होणाऱ्या नुकसानावर लक्ष ठेवते. या प्रोटीनचे नाव p53 आहे. वैद्यकीय भाषेत याला ट्यूमर सप्रेसर म्हणजेच ट्यूमर तयार होण्यास प्रतिबंध करणारे प्रोटीन असे म्हटले जाते. शरीरातील या नैसर्गिक p53 प्रोटीनची कार्यक्षमता चांगली राहिल्यास कर्करोगाचा धोका वाढवणारे बदल रोखण्यास मदत होऊ शकते.
डॉक्टरांच्या मते, आपल्या शरीरात सतत नवीन पेशी तयार होत असतात. काही वेळा या पेशींच्या DNA चे नुकसान होते. हे नुकसान वेळेत दुरुस्त झाले नाही, तर काही पेशी वेगाने वाढू लागतात. शरीराच्या एखाद्या भागात पेशींची वाढ अनियंत्रित झाल्यास कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत p53 प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावते. डीएनएचे नुकसान झाल्यानंतर हे प्रोटीन सक्रिय होऊन पेशींची अनियंत्रित वाढ रोखण्यास मदत करते.
शरीरातील p53 प्रोटीनचे प्रमाण वाढवता येते का?
शरीरातील p53 प्रोटीनचे प्रमाण वाढवण्यासाठी कोणतेही विशिष्ट सप्लिमेंट किंवा ठरावीक आहार उपलब्ध असल्याचे ठोस पुरावे नाहीत. वैद्यकीय दृष्टिकोनातून हे प्रोटीन वाढवण्यापेक्षा त्याचे कार्य योग्य प्रकारे सुरू राहणे महत्त्वाचे आहे. p53 प्रोटीन व्यवस्थित कार्य करत असल्यास डीएनएचे नुकसान झालेल्या पेशींची अनियंत्रित वाढ रोखण्यास मदत होऊ शकते. मात्र, p53 प्रोटीनची कार्यक्षमता चांगली ठेवली तरी कर्करोगापासून पूर्णपणे संरक्षण मिळेल, असे नाही. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.
p53 प्रोटीन निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?
दररोज वेगवेगळ्या रंगांची फळे आणि भाज्या खावे. आहारात डाळी, संपूर्ण धान्ये आणि सुका मेवा यांचा समावेश केला पाहिजे. हळद आणि ग्रीन टी यांचा आहारात समावेश करता येतो. मात्र, हे पदार्थ p53 प्रोटीनची कार्यक्षमता वाढवतात किंवा कर्करोग रोखतात, याबाबत ठोस मानवी पुरावे मर्यादित आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार झिंक आणि व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट घ्यावीत. स्वतःहून सप्लिमेंट घेणे टाळावे. धूम्रपान आणि मद्यपान टाळावे.
