देशातील सर्व ब्रँड्सच्या मीठ-साखरेत मायक्रोप्लास्टिक्स; रिसर्चमध्ये दावा, आरोग्यवर काय परिणाम?
मीठ आणि साखर यांचं सेवन आपण रोजच्या विविध आहारांतून करतो. मात्र याच मीठ आणि साखरेत मायक्रोप्लास्टिक्स आढळल्याची धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली आहे. हे मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय, शरीराला त्यापासून काय धोका असतो, याबद्दल जाणून घेऊयात..

मीठ आणि साखर हे आपल्या दैनंदिन आहारातील सर्वांत महत्त्वाचे घटक आहेत. दिवसभरात आपण जे काही खाद्यपदार्थ खातो, त्या प्रत्येकात चव आणण्यासाठी साखर किंवा मीठाचा वापर आवर्जून केला जातो. आहारातील हेच सर्वांत महत्त्वाचे घटक आपल्या शरीरातील आजारांचेही स्रोत ठरू शकतात. नुकत्याच एका अभ्यासात मीठ आणि साखरेबद्दलची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अभ्यासानुसार, भारतातील जवळपास सर्व ब्रँडच्या साखर आणि मीठांमध्ये मायक्रोप्लास्टिक्स आढळले आहेत. ‘टॉक्सिक्स लिंक’ या पर्यावरण संशोधन संस्थेनं केलेल्या या महत्त्वपूर्ण अभ्यासात भारतातील प्रत्येक ब्रँडच्या मीठ आणि साखरेची चाचणी करण्यात आली. या प्रत्येक ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिक्स असल्याची चिंताजनक बाब उघड झाली आहे. या संशोधनात मीठाचे दहा विविध प्रकार तपासले गेले. त्यात टेबल, रॉक, सी आणि स्थानिक प्रकारच्या मीठाचा समावेश होता. तसंच ऑनलाइन आणि स्टोअरमधून खरेदी केलेल्या पाच प्रकारच्या साखरेचं परीक्षण करण्यात आलं होतं. या संशोधनाचं निष्कर्ष अगदी स्पष्ट होतं. मीठ आणि साखरेच्या सर्व नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळले आहेत. यात कोणताही प्रकार किंवा ब्रँड अपवाद ठरला नाही. ...
