भूकंपामुळे राज कपूर यांच्या 104 वर्ष जुन्या हवेलीचं मोठं नुकसान, संरक्षणासाठी प्रशासनाची हालचाल
भूकंपामध्ये राज कपूर यांच्या 104 वर्ष जुन्या हवेलीचं मोठं नुकसान.ऐतिहासिक वास्तू जपण्यासाठी अधिकाऱ्यांनी केली सरकारकडे मोठी मागणी.

Bollywood Actor Raj Kapoor: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राज कपूर आज आपल्यात नसले तरी त्यांची समृद्ध परंपरा आणि वारसा आजही जिवंत आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबाशी संबंधित एक ऐतिहासिक वास्तू सध्या धोक्यात आली आहे. पाकिस्तानमधील पेशावर येथे असलेल्या कपूर हवेलीला नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे मोठं नुकसान झालं असून तिचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
राज कपूर यांची ही संपत्ती पेशावरमधील पेशावर येथे आहे. ही ‘कपूर हवेली’ गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत आहे. जवळपास दशकभरापासून या ऐतिहासिक इमारतीच्या दुरुस्तीची मागणी होत असतानाही कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नाहीत. अलीकडे पाकिस्तानमध्ये झालेल्या भूकंपासोबतच सततच्या पावसामुळे या हवेलीची अवस्था आणखी खालावली आहे.
भूकंपाच्या धक्क्यांमुळे हवेलीच मोठं नुकसान
शुक्रवारी रात्री आलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे या हवेलीचा एक भाग पूर्णपणे कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, या घटनेमुळे उर्वरित हवेलीच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात खैबर पख्तूनख्वा वारसा परिषदचे सचिव शकील वहीदुल्लाह यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, भूकंपानंतर हवेलीचा एक भाग ढासळला असून उरलेल्या भागाचं संरक्षण करणं आता अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी पुरातत्व विभाग आणि सरकारला तातडीने या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना करण्याचं आवाहन केलं आहे.
खैबर पख्तूनख्वा प्रांतातील ही हवेली पाकिस्तानमधील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये गणली जाते. तिचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूप मोठं आहे, त्यामुळे तिचं जतन करणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.
या हवेलीत किती खोल्या
कपूर हवेलीचा इतिहासही तितकाच समृद्ध आहे. ही हवेली देवान बशेश्वरनाथ कपूर यांनी 1918 ते 1922 या काळात बांधली होती. पृथ्वीराज कपूर यांनी आपल्या आयुष्यातील मोठा काळ येथे घालवला होता. तसेच राज कपूर आणि त्यांचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्मही याच हवेलीत झाला होता.
या हवेलीत तब्बल 40 खोल्या आहेत आणि एकेकाळी ती परिसरातील आकर्षणाचं केंद्र होती. मात्र, 1947 च्या फाळणीनंतर ही हवेली ओस पडली आणि त्यानंतर तिची योग्य देखभाल झाली नाही. आज या हवेळीची वेळेवर दुरुस्ती न झाल्याने तिची अवस्था दिवसेंदिवस खराब होत आहे.