चीन आणि नेपाळनंतर आता जपानमध्ये भूकंप, भारताला किती धोका?

जपानच्या कांतो भागाजवळ समुद्रात शुक्रवारी संध्याकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. 10 किलोमीटर खोलीवर झालेल्या या भूकंपानंतर जपानी प्रशासनाने त्सुनामीचा इशारा दिलेला नाही.

चीन आणि नेपाळनंतर आता जपानमध्ये भूकंप, भारताला किती धोका?
Image Credit source: social media
| Updated on: Nov 06, 2026 | 9:04 PM

मोठी बातमी समोर आली आहे. आशिया खंडातील तीन देशांमध्ये अवघ्या दोन दिवसांत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. नेपाळ आणि चीननंतर आता जपानमध्येही 6.1 तीव्रतेचा भूकंप झाला. शुक्रवारी (6 नोव्हेंबर) जपानच्या पूर्व किनारपट्टीवर आणि राजधानी टोकियोजवळ बसलेल्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, चीनमधील भूकंपाचे धक्के जम्मू-काश्मीरमधील काही भागांतही जाणवले. त्यामुळे या भूकंपांच्या पार्श्वभूमीवर भारताला किती धोका आहे आणि देशातील कोणते भाग भूकंपप्रवण आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जपानमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप

जपान हवामान संस्था JMAने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7:39 वाजता कांतो भागाच्या किनारपट्टीजवळ समुद्रात भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.1 नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रात सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होता.

Loading...

अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्था USGS च्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र टोकियोच्या पूर्वेला असलेल्या असाही शहरापासून सुमारे 169 किलोमीटर आग्नेय दिशेला होते. टोकियोसह मियागी, फुकुशिमा आणि इबाराकी प्रांतांमध्येही धक्के जाणवले. मात्र, या भूकंपानंतर त्सुनामीचा कोणताही इशारा जारी करण्यात आलेला नाही. प्राथमिक माहितीनुसार, जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

भारताला किती धोका?

भारताच्या दृष्टीने पाहिल्यास हिमालयीन पट्टा आणि ईशान्य भारतातील अनेक भाग भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये भूकंपाचा धोका अधिक आहे. भारतात भूकंपाच्या संभाव्य धोक्यानुसार वेगवेगळे भूकंपप्रवण क्षेत्र निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे या भागांमध्ये भूकंपरोधक बांधकाम आणि आपत्ती व्यवस्थापनाला विशेष महत्त्व आहे. मात्र, जपान, चीन आणि नेपाळमध्ये भूकंप झाल्याने भारतातही भूकंप होणारच, असे म्हणता येत नाही.

नेपाळ आणि चीनमध्येही हादरे

दरम्यान, शुक्रवारी सकाळी नेपाळमधील हुमला भागात 4.2 तीव्रतेचा भूकंप झाला. सकाळी 7:10 वाजता जाणवलेल्या या धक्क्यांचा परिणाम मुगू आणि बझांग जिल्ह्यांतही झाला. दुसरीकडे, गुरुवारी रात्री चीनच्या शिनजियांग प्रांतात 5.0 तीव्रतेचा भूकंप झाला. त्याचे धक्के जम्मू-काश्मीरमधील काही भागांत जाणवले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us