
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा यशस्वी ठरला. भारताने जगात अचूक, योग्य संदेश जाईल अशा प्रकारे पुतिन यांचं आदिरातिथ्य केलं. युक्रेन विरुद्ध युद्धामुळे रशिया आज जगात एकाकी पडला आहे. चीन, भारत असे मोजके देश रशियासोबत आहेत. भारताची रशियासोबतची जवळीक युरोप, अमेरिकेला भरपूर खटकते. दोघांमधील व्यापारही या देशांना पटत नाही. म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. आता पुतिन येऊन गेल्यानंतर युरोप आणि अमेरिकेत भारतविरोधी मत, प्रचार अजून वाढू शकतो. भारताने नेहमीच रशिया-युक्रेन युद्धात तटस्थता दाखवली आहे. आपली भूमिका संतुलित आहे असा संदेश दिला आहे. आता पुतिन यांच्या दौऱ्यानंतर सुद्धा भारत असचं करणार आहे.
पुतिन येऊन गेल्यानंतर भारत आता युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांचं स्वागत करण्याच्या योजनेवर काम करत आहे. कूटनितीक आघाडीवर ही एकदम परफेक्ट खेळी आहे. भारताचं परराष्ट्र धोरण संतुलित आहे, असा कूटनितीक आघाडीवर यातून संदेश देणार आहे. जानेवारी 2026 मध्ये जेलेंस्की भारत दौऱ्यावर येऊ शकतात. अजून या दौऱ्याची तारीख ठरलेली नाही. पुतिन यांच्यानंतर जेलेंस्कींना निमंत्रण म्हणजे एकप्रकारे ही युरोप, अमेरिकेच तोंड बंद करणारी एकदम परफेक्ट खेळी आहे.
अनेक आठवड्यांपासून चर्चा सुरु
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार भारत अनेक आठवड्यांपासून युक्रेनच्या राष्ट्रपती कार्यालयाच्या संपर्कात आहे. राष्ट्रपती पुतिन भारतात येण्याआधीपासून भारताचे जेलेंस्की यांच्या दौऱ्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या बाबत भारत आणि युक्रेनी अधिकाऱ्यांमध्ये अनेक आठवड्यांपासून चर्चा सुरु आहे. पुतिन भारतात येण्याआधीपासून नवी दिल्ली जेलेंस्की यांच्या ऑफिसच्या संपर्कात आहे.
अनेक महिन्यांपासून काम सुरु
जेलेंस्की यांच्या दौऱ्यामुळे भारताला आमच्यासाठी रशिया आणि युक्रेने दोघे समान आहेत हा संदेश देता येईल. भारत या नितीवर मागच्या अनेक महिन्यांपासून काम करत आहे. मागच्यावर्षी जुलै 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉस्कोला जाऊन पुतिन यांना भेटले, त्यानंतर एक महिन्याने ते ऑगस्टमध्ये युक्रेन दौऱ्यावर गेले होते.
यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून
यूक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांच्या प्रस्तावित दौऱ्याची वेळ आणि कक्षा अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची शांती योजना कशी पुढे जाते, युद्धाच्या मैदानात काय होतं? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.