ज्यासाठी जंग जंग पछाडले… ते 500 किलो युरेनियम इराणने दडवले कुठे? ट्रम्प हात चोळत बसले, अमेरिकेच्या काळजाला कायमचा घोर
Iran Hide 500 Kg Enriched Uranium: अमेरिकेकडून हल्ला होऊ शकतो या भीतीने इराणने ते 500 किलो युरेनियम अशा ठिकाणी दडवले की, डोनाल्ड ट्रम्प यांना त्याचा लवकर सुगावा लागणार नाही. काय आहे ती मोठी अपडेट? अमेरिकेच्या काळजाला कायमचा घोर

Iran Hide 500 Kg Enriched Uranium: इराणकडील 500 किलो समृद्ध युरेनियम हाती लागावे यासाठी अमेरिकेने जंग जंग पछाडले. इस्त्रायल आणि अमेरिकेने गेल्या तीन महिन्यांपासून इराणला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. आता पुन्हा शांती वार्ताची चर्चा सुरू झाली आहे. तरीही 500 किलो समृद्ध युरेनियम साठा काही जगातील महासत्तेच्या हाती लागणार नसल्याचे समोर येत आहे. इराणने हा युरेनियमाचा साठा दडवला तरी कुठे? युएसच्या गुप्तहेर खात्यातील सूत्रांनी याविषयीचा मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे शांतता करार होऊनही अमेरिकेच्या काळजाला कायमचा घोर राहणार आहे.
500 किलो युरेनियम दडवले कुठे?
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इराणने गेल्या काही आठवड्यात बॉम्ब आणि स्फोटकं तयार करण्यास योग्य असलेला युरेनियमचा मोठा साठा गोपनीय ठिकाणी दडवला. त्याने तो कायमचा जमिनीच्या पोटात गाडला. इराणच्या एका प्रांतात भूमिगत बोगद्यांचे दाट जाळे आहे. तिथे हे युरेनियम दडवण्यात आले आहे. तर त्या साठ्याच्या प्रवेशद्वारावरच स्फोटकं पेरण्यात आली आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे युरेनियम जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर इराणने युरेनियमचा साठा हा दडवला त्यावर स्फोटकं लावली. त्यामुळे शांतता वार्तामध्ये हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. आता हे प्रकरण अधिक किचकट झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
शांतता करारात मोठा अडथळा
इराणच्या या नवीन खेळीने ट्रम्प प्रशासनाच्या हाती काही लागणार नाही. त्यामुळे आता शांतता करार पुढे सरकेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. जोपर्यंत इराण युरेनियमचा साठा अमेरिका, रशिया आणि संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थेला देत नाही तोपर्यंत शांतता करार होणार नसल्याचे भूमिका ट्रम्प यांनी घेतलेली आहे. तर एका दाव्यानुसार, 500 किलो युरेनियम हे इराणमध्ये नष्ट करण्यात येणार होते. त्यानंतर उर्वरीत युरेनियम हे इराणबाहेर नेण्यात येणार होते. आता शांतता करार अंतिम टप्प्यात आला असतानाच इराणने युरेनियम हे बोगद्यात दडवले आहे. हे बोगदेही बंद करण्यात आले आहे. याठिकाणी जाणे अत्यंत धोकादायक आणि अवघड झाले आहे. कारण या परिसरात स्फोटकांची माळच इराणने पेरली आहे. हा मोठा धोका आहे. त्यामुळे अमेरिकेच्या हाती या शस्त्रसंधीतून काय हाती लागते आणि अजून एखादं तिरकस कलम घालून ट्रम्प इराणवर हल्ला चढवतात का? याकडे जगाचे लक्ष लागले आहे.