NSA प्रमुख अजित डोवाल मैदानात, अमेरिकेकडून लसीच्या कच्च्या मालाला हिरवा कंदील, नेमकं काय घडलं?

| Updated on: Apr 25, 2021 | 11:55 PM

मागील काही दिवसांच्या आडकाठीनंतर अखेर अमेरिकेने भारताला कोरोनाच्या लढ्यात साथ दिलीय.

NSA प्रमुख अजित डोवाल मैदानात, अमेरिकेकडून लसीच्या कच्च्या मालाला हिरवा कंदील, नेमकं काय घडलं?
Follow us on

वॉशिंग्टन : मागील काही दिवसांच्या आडकाठीनंतर अखेर अमेरिकेने भारताला कोरोनाच्या लढ्यात साथ दिलीय. भारतीय NSA प्रमुख अजित डोवाल यांनी अमेरिकेचे NSA प्रमुख जॅके सुलीवॉन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अमेरिकेकडून लसीसाठी लागणाऱ्या कच्चा माल पुरवण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतातील लसीकरणाला वेग मिळणार आहे. विशेष म्हणजे याआधी अमेरिकेने सीरमच्या मागणीनंतरही कोरोना लसीच्या कच्च्या मालाबाबत निर्बंधाची भूमिका घेतली होती (America show green signal to India for Serum raw material of corona vaccine).

नव्या निर्णयानुसार अमेरिकेने भारताला पीपीई किट, रॅपिड टेस्टिंग कीट, ऑक्सिजन जनेरशन संदर्भात मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. अमेरिकेच्या आरोग्य खात्याचं तज्ज्ञांचं पथकही भारतात येणार आहे. हे पथक भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबत भारतातील कोरोना कमी करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणार आहे.

याशिवाय अमेरिकेची डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आगामी काळात भारताला 2022 च्या अखेरपर्यंत 100 कोटी कोरोना डोस तयार करता येतील इतक्या कच्च्या मालाच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणार आहे.

अमेरिकेनं भारताचं ‘रॉ’ मटेरियल रोखलं, चीननं डिवचलं

चीनने अमेरिकेला भारतात कोरोनाचं संकट आलेलं असताना कोरोना लसीच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर लावलेल्या निर्बंधावरुन चांगलंच घेरलंय. चीनची सरकारी वृत्तसंस्था असलेल्या ग्लोबल टाईम्सने एक कार्टून प्रकाशित केलंय. यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी आपण भारतासोबत असल्याच्या वक्तव्याचा आधार घेत शाब्दिक फुलोऱ्यांपेक्षा कृतीच अधिक स्पष्टपणे बोलते असं म्हटलंय. भारतात एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढतेय, तर दुसरीकडे कोरोनावर उपचार करणाऱ्या औषधांसह ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यातच सीरम इन्स्टिट्युटला कोरोना लसी तयार करण्यासाठी आवश्यक असलेला अमेरिकेतून येणारा कच्चा मालही कमी पडलाय. अमेरिकेने मात्र याबाबत आडमुठी भूमिका घेतल्याचं दिसतंय. यावरुनच चीनने अमेरिकेला लक्ष्य केलंय.

ग्लोबल टाईम्सच्या या कार्टूनमध्ये अमेरिका आपण भारतीय नागरिकांसोबत असल्याचं बोलताना दाखवलंय. मात्र, दुसरीकडे कोरोना लसीच्या कच्च्या मालावर निर्बंध लावत असल्याचं रेखाटलंय. हे कार्टून ट्विटरवर पोस्ट करताना ग्लोबल टाईम्सने शब्दांपेक्षा कृती अधिक मोठ्याने बोलते असं कॅप्शन दिलंय. तसेच व्हॅक्सिन रॉ मटेरियल आणि इंडिया फाईट्स कोविड 19 हे दोन हॅशटॅग वापरले आहेत.

‘जो बायडन सर, कळकळीची विनंती, लसीच्या कच्च्या मालावरील निर्बंध हटवा’

दरम्यान, कोरोना लसींसाठी लागणारा कच्चा माल अमेरिका आणि युरोपातील काही देशांनी रोखून धरल्याने सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ट्विटरवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना टॅग करुन अमेरिकेने कच्च्या मालावरील हे निर्बंध उठवावे, अशी विनंती केली होती.

अदर पुनावाला नेमकं काय म्हणाले होते?

“आदरणीय जो बायडन सर, कोरोना विरोधाच्या या लढाईत आपण खरंच एकत्र लढत असू तर माझी कळकळीची एक नम्र विनंती आहे. कोरोना लसीसाठी लागणारा कच्चा माल अमेरिकेत रोखून ठेवण्यात आला आहे. कृपया कच्च्या मालावरील हे निर्बंध तातडीने हटवा, जेणेकरुन लसीचे उत्पादन वाढवता येईल”, असं अदर पुनावाला ट्विटरवर म्हणाले आहेत. मात्र, त्यावर अद्याप बायडन यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

‘आताच कच्च्या मालाची जास्त आवश्यकता’

अदर पुनावाला यांनी चार दिवसांपूर्वी ‘इंडिया टूडे’ला दिलेल्या मुलाखतीत लसीच्या उत्पादनावरुन चिंता व्यक्त केली होती. “लसीसाठी आवश्यक असलेला कच्चा माल अमेरिका आणि युरोपातील काही देशांनी रोखून धरला आहे. हाच सर्वात मोठा अडथळा आहे, ज्यामुळे उत्पादन वाढवणं आव्हान होऊन बसलं आहे. आम्हाला आताच कच्च्या मालाची सर्वात जास्त गरज आहे, ज्यामुळे भारत आणि जगाच्याही लसीची गरज पूर्ण होऊ शकते”, असं पुनावाला यांनी सांगितलं होतं.

हेही वाचा :

अमेरिकेनं भारताचं ‘रॉ’ मटेरियल रोखलं, चीननं डिवचलं, तीन देश, एक कार्टून, वाचा सविस्तर

कोरोना लसींच्या कच्च्या मालावर निर्यातबंदी, मानवतेचा पुळका असलेल्या अमेरिकची मानवता कुठे हरवली? शिवसेनेचा सवाल

‘जो बायडन सर, कळकळीची विनंती, लसीच्या कच्च्या मालावरील निर्बंध हटवा’, अदर पुनावाला यांचे अमेरिकेच्या अध्यक्षांना विनवण्या

व्हिडीओ पाहा :

America show green signal to India for Serum raw material of corona vaccine