Strait Of Hormuz : स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद झाल्यास भारताचं फार नाही, पण चीनच डबल नुकसान, कसं ते समजून घ्या
Strait Of Hormuz : इराण-इस्त्रायल युद्धादरम्यान इराणी संसदेने स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता क्रूड ऑइलच्या किंमतीवरुन बरेच अंदाज लावले जात आहेत. हा जलमार्ग उद्या बंद झाला, तर भारतापेक्षा पण जास्त नुकसान चीनच होईल, कसं ते समजून घ्या.

इराण-इस्रायल युद्ध दिवसेंदिवस गंभीर होत चाललं आहे. मिडल ईस्टमध्ये तणाव सुरु होऊन दहापेक्षा जास्त दिवस झालेत. पण दोन्ही देशांपैकी कोणी मागे हटायला तयार नाही. अमेरिकेने सुद्धा या युद्धात उडी घेतली आहे. अमेरिकेने शनिवार-रविवारच्या मध्यरात्री इराणच्या तीन अणवस्त्र प्रकल्पांवर शक्तीशाली बॉम्बहल्ले केले. हजारो किलो वजनाचे बॉम्ब टाकून अणवस्त्र तळ नष्ट केले. त्यामुळे इराण खवळला आहे. इराणी संसदेने स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर अंतिम शिक्कामोर्तब अजून झालेलं नाही. हा खाडी मार्ग बंद झाल्यास सर्वात जास्त नुकसान भारताच नाही, चीनच होणार. स्ट्रेट ऑफ होर्मुज चीनची लाइफ-लाइन आहे. हा जलमार्ग बंद झाल्यास चीनचा का आणि किती नुकसान होणार?
22 जून 2025 रोजी इराणी संसदेने स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर क्रूड ऑइलच्या किमतींवरुन पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. हा खाडी मार्ग बंद झाल्यास चीनसारख्या मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशाला फटका बसेल. क्रूड ऑइलच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, या खाडी मार्गावरुन भारताच दररोज 20 लाख बॅरल क्रूड ऑइल येतं. याचा भारतीय तेल बाजारावर परिणाम दिसू शकतो. “होर्मुज बंद झाल्याने देशाच काही नुकसान होणार नाही. भारताने पुढचे अनेक आठवडे पुरेल इतकं तेल साठवून ठेवलं आहे” असं केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं आहे.
चीनलाच सर्वात जास्त फटका का?
भारताने या संकटाचा सामना करण्याची तयारी आधीपासूनच केली होती. भारताकडे दुसरे पर्याय सुद्धा आहेत. पण होर्मुजची खाडी बंद झाल्यास चीनलाच सर्वात जास्त फटका बसेल. कारण चीन जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. यूएस एनर्जी इन्फॉर्मेशन एडमिनिस्ट्रेशननुसार, 2024 मध्ये चीन प्रतिदिवस 4.3 मिलियन बॅरल कच्चा तेलाच प्रोडक्शन करत होता आणि 11.1 मिलियन बॅरल आयात करायचा.
अमेरिका चीनशी बोलणार
चीनचा एकूण तेल आयातीचा 45% हिस्सा होर्मुज जलडमरूमध्यमधून येतो. हा खाडीमार्ग बंद झाल्यास सर्वात जास्त नुकसान चीनच होईल. इराणच्या संसदेने होर्मुजचा खाडी मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी चीनसंबंधी वक्तव्य केलं आहे. होर्मुज खाडीसंबंधी आम्ही चीनशी चर्चा करु. कारण हा देश खाडीमार्गावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, असं ते म्हणाले.
