पाकिस्तानमध्ये मोठं ऑपरेशन… देशांतर्गत हल्ला? थेट 14 चौक्या बळकावल्या

बलोच लिबरेशन आर्मीने (बीएलए) पाकिस्तानातील बलोचिस्तानात गेल्या तीन महिन्यांत 14 सैन्य चौक्या बळकावून नष्ट केल्याचा दावा केला आहे. त्यांनी शस्त्रसाठा लुटल्याचा व्हिडीओही जारी केला. पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, पाकिस्तानने यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. बीएलएच्या दाव्यातील तथ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

पाकिस्तानमध्ये मोठं ऑपरेशन... देशांतर्गत हल्ला? थेट 14 चौक्या बळकावल्या
BLA attack Pakistan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 15, 2026 | 10:20 AM

पाकिस्तानातील बलोच बंडखोरांनी मोठा दावा केला आहे. गेल्या तीन महिन्यात पाकिस्तानच्या 14 हून अधिक चौक्यांवर ताबा मिळवला असल्याचा दावा बलोच लिबरेशन आर्मीने केला आहे. एवढेच नव्हे तर या सर्व चौक्या नेस्तनाबूत केल्यानंतर चौक्यांमधील शस्त्रसाठा लूटण्यात आल्याचा दावाही बीएलएने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानसाठी हा सर्वात मोठा हादरा असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, बीएलएच्या या दाव्यावर पाकिस्तानकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए)ने एक व्हिडीओ जारी करून हा दावा केला आहे. या व्हिडीओत बीएलएचे बंडखोर पाकिस्तानी सैन्यांच्या चौक्यांवर ताबा मिळवताना दिसत आहेत. तसेच या चौक्या कशा पद्धतीने नेस्तनाबूत करण्यात आल्या आहेत, हे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. ही संपूर्ण कारवाई सुनियोजित पद्धतीने करण्यात आल्याचा दावाही या बंडखोरांनी केला आहे.

बीएलएचा दावा काय?

बीएलएच्या दाव्यानुसार, आमच्या बंडखोरांनी गेल्या तीन महिन्यात बलोचिस्तानमधील वेगवेगळ्या ठिकाणच्या पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या 14 चौक्यांवर ताबा मिळवला आहे. या चौक्यांवर नियंत्रण मिळवल्यानंतर त्या नष्ट करण्यात आल्या आहेत. मात्र, या चौक्यांमधील पाकिस्तानी सैनिकांचे काय झाले? याची माहिती मात्र यात देण्यात आलेली नाहीये.

बीएलएने या कारवाईत हत्यारे जप्त केल्याचा दावाही केला आहे. सुरक्षा दलांचे शस्त्रे आणि अन्य सामानही आमच्या हाती लागले आहे, असं बीएलएने म्हटलं आहे. पण किती शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत, हे मात्र बीएलएने स्पष्ट केलेलं नाही. तसेच कोणत्या प्रकारचं सामान जप्त केलं आहे, याची माहितीही दिलेली नाही. ज्या विभागांचा बीएलएने उल्लेख केला आहे, त्यात क्वेटा-तफ्तान व्यापारी मार्गाचाही समावेश आहे. आमची कारवाई वेगवेगळ्या ठिकाणी झाली आहे. त्यावेळी आम्ही हा ताबा मिळवला आहे, असंही बीएलएने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, ज्या चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा बीएलए करत आहे. त्या ठिकाणी नेमकं काय झालं? आता काय परिस्थिती आहे? त्याबाबत बीएलएने काहीच स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे बीएलएच्या दाव्यात किती तथ्य आहे? यावरही प्रश्नचिन्ह आहेत.

व्हिडीओ फुटेज जारी

बीएलएने आपल्या दाव्याच्या समर्थनासाठी काही व्हिडीओ फुटेज जारी केले आहेत. या फुटेजमध्ये संघटनेचे लोक सैन्य चौकीच्या आसपास दिसत आहेत. काही ठिकाणी या चौक्यांची पडझड झालेली दिसत आहेत. संघटनेच्या दाव्यानुसार, ताबा मिळवलेल्या त्या याच चौक्या आहेत. आम्ही ताबा मिळवल्यानंतर त्या उद्ध्वस्त केल्या, असं त्यांचं म्हणणं आहे. या व्हिडीओत शस्त्रे आणि इतर सामानही दिसत आहे. दरम्यान, बीएलएच्या व्हिडीओवर पाकिस्तानकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे बीएलएने केलेला दावा आणि पुरावे संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us