
बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) रविवारी दावा केला की, ऑपरेशन हेरॉफच्या दुसऱ्या टप्प्यात बलूचिस्तानच्या अनेक भागात केलेले हल्ले 40 तासापेक्षा अधिकवेळ सुरु होते. संघटनेने ग्वादर येथे झालेल्या धुमश्चक्रीचा व्हिडिओ सुद्धा जारी केलाय. यात एक महिला फिदायीन फायटर दिसतेय. BLA चा प्रवक्ता जीयंद बलूचनुसार संघटनेने खरान, मस्तुंग, दलबंदीन, तुंप आणि पसनी आपलं ठरवलेलं लक्ष्य साध्य केलय आणि ते सुरक्षित ठिकाणी परतले आहेत. काही भागांमध्ये झडपा अजूनही सुरुच आहेत. पाकिस्तानी सैन्य, पोलीस आणि फ्रंटियर कोरचे 200 पेक्षा जास्त जवान मारले गेलेत असा BLA ने दावा केला. 17 जणांना बंदी बनवलय. आपले 18 फायटर्स मारले गेल्याचं BLA ने मान्य केलं. यात 11 मजीद ब्रिगेड, चार फतेह स्क्वाड आणि तीन STOS शी संबंधित आहेत. या दाव्याची अजून स्वतंत्र पुष्टि झालेली नाही.
BLA ने आपल्या संघटनेच्या महिला फिदायीनची ओळख हवा बलूच उर्फ द्रोशुम अशी केली आहे. हा तिचा शेवटचा संदेश आहे, जो शहीद होण्याच्या 12 तास आधी रेकॉर्ड केलेला. सूत्रांच्या माहितीनुसार, हवा बलूच एक लेखिका होती. तिचे पिता सुद्धा बलूच सशस्त्र आंदोलनाशी जोडलेले होते. काही वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झालेला. व्हिडिओमध्ये हवा बलूच बलूच महिलांना सशस्त्र संघर्षात सहभागी होण्याचं आवाहन करताना दिसतेय.
BLA ची सर्वाधिक वय असलेली फिदायीन
BLA ने आणखी एक व्हिडिओ जारी केलाय. यात फिदायीन नाको फजल बलूच दिसतेय. BLA ची सर्वाधिक वय असलेली फिदायीन आहे. हा व्हिडिओ पसनी तहसीलशी संबंधित असल्याचं सांगितलं जातय.
रविवारी रात्रीपर्यंत हल्ल्याचं सत्र सुरु
शनिवारी सुरु झालेल्या या हल्ल्याचं सत्र रविवारी रात्रीपर्यंत ग्वादर, नुश्की आणि क्वेटाच्या काही भागात सुरु होतं. ग्वादर पोर्ट भागात दिवसभर गोळीबार आणि स्फोटाचे आवाज ऐकू येत होते. काही रिपोर्ट्समद्ये चिनी प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आल्याची चर्चा आहे. नुश्की येथे फ्रंटियर कोरच्या चौक्या आणि सरकारी कार्यालयांजवळ धुमश्चक्री झाल्याची माहिती आहे.
सरकारी रुग्णालयामध्ये इमर्जन्सी घोषित
बलूचिस्तान सरकारने परिस्थिती पाहून सर्व सरकारी रुग्णालयामध्ये इमर्जन्सी घोषित केली आहे. क्वेटा ट्रॉमा सेंटर आणि सिविल रुग्णालयात ऑपरेशन थिएटर अलर्टवर आहेत. अतिरिक्त मेडिकल स्टाफ तैनात केला आहे. पंजाबच्या डेरा गाजी खान जिल्ह्यातून बलूचिस्तानात जाणारे रस्ते सुरक्षाकारणांमुळ बंद करण्यात आले आहेत. फोर्ट मुनरो हायवे आणि तौसामूसा खेल रोड येथे ट्रॅफिक थांबवण्यात आलय.