जिहाद पाहिजे… जिहादनेच जगायचंय…; अतिरेक्यांची रस्त्यावर उतरून घोषणाबाजी, शेजारील देशात काय घडतंय?

बांगलादेशमधील सत्तांतरा नंतर बंदी घातलेल्या इस्लामिक जिहादी संघटनांची सक्रियता वाढली आहे. शुक्रवारी, ढाक्यात जिहाद समर्थनाच्या घोषणा देण्यात आल्या. 300 हून अधिक दहशतवादी जामिनावर सोडण्यात आले आहेत. जमात-ए-इस्लामीने शनिवारी रॅलीचे आयोजन केले. यामुळे बांगलादेशमध्ये पुन्हा दहशतवादी धोका निर्माण झाला आहे.

जिहाद पाहिजे... जिहादनेच जगायचंय...; अतिरेक्यांची रस्त्यावर उतरून घोषणाबाजी, शेजारील देशात काय घडतंय?
Bangladesh Islamist group
| Updated on: Jul 20, 2025 | 12:54 PM

बांगलादेशमध्ये अवामी लीग सरकार कोसळल्यानंतर आता बंदी घातलेल्या आणि कट्टरपंथी संघटनांची सार्वजनिक सक्रियता पुन्हा एकदा वाढल्याचं दिसत आहे. शुक्रवारी, जुम्माच्या नमाजानंतर ढाक्यातील राष्ट्रीय मशीद बैतुल मुकर्रमच्या परिसरात हिज्ब उत-तहरीर, विलायाह बांगलादेश, अंसार अल-इस्लाम आणि जमात-ए-इस्लामी यांसारख्या इस्लामिक जिहादी संघटनांच्या सदस्यांनी उघडपणे ‘जिहाद’च्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्यासोबतच त्यांनी स्वतःला जिहादी असं संबोधलं. अवामी लीग सरकारच्या काळात या संघटनांना देशभरातील बॉम्बस्फोट आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल बंदी घालण्यात आली होती. कागदोपत्री आजही या संघटनांवर बंदी आहे. मात्र तरी आता घोषणाबाजी आणि पोस्टर्सच्या माध्यमातून उघडपणे सक्रिय झाल्या आहेत.

300 हून अधिक दहशतवादी तुरुंगातून बाहेर

बांगलादेशात 5 ऑगस्ट रोजी सत्तांतर झाले. त्यानंतर आलेल्या अहवालानुसार दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या शेकडो लोकांना जामिनावर सोडण्यात आलं आहे. तुरुंग विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 300 हून अधिक दहशतवादी तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यापैकी काहींना जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली होती. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जिहादी गटांचे सदस्य ढाकाच्या विविध जिल्ह्यांमधून आले होते. त्यांनी जुम्माच्या नमाजानंतर मशिदीबाहेर “जिहाद पाहिजे, जिहादाने जगायचं आहे”, “नारा-ए-तकबीर, अल्लाहु अकबर”, “कोण आहोत आम्ही? दहशतवादी, दहशतवादी”, “इस्लामिक बांगलादेशमध्ये काफिरांना जागा नाही” अशाप्रकारच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. घोषणा दिल्या.

सार्वजनिक ठिकाणी इस्लामिक घोषणा

तसेच गेल्या 11 महिन्यांत, केवळ जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश (JMB) शी संबंधित 148 आरोपींना जामिनावर सोडण्यात आलं आहे. यातील अनेकजण हरकत-उल-जिहाद, अंसारुल्लाह बांगला टीम, हिज्ब उत-तहरीर, हमजा ब्रिगेड यांसारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत. अंसारुल्लाह बांगला टीमचा प्रमुख मानला जाणारा मुफ्ती जसीमुद्दीन रहमानी यालाही सत्तांतरानंतर जामीन मिळाला आहे. तो लष्कराच्या समर्थनासह सार्वजनिक ठिकाणी इस्लामिक घोषणा देताना दिसल्याचं सांगण्यात येतं.

दरम्यान, जमात-ए-इस्लामी शनिवारी ढाका येथील सुहरावर्दी उद्यानात एका राष्ट्रीय रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारपासूनच पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक राजधानीत एकत्र येताना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी ते पारंपरिक वेशभूषेत तर काही पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसले, ज्यावर “पहिलं मत लुटेऱ्यांविरुद्ध” आणि “तराजूला मत द्या” असं लिहिलं होतं.